सावंतवाडीत घसरलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्थ्यावर ?

Decrease In Voting Percentage In Sawantwadi Corporation Sindhudurg Marathi News
Decrease In Voting Percentage In Sawantwadi Corporation Sindhudurg Marathi News

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - चुरशीच्या झालेल्या येथील नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी 57.46 टक्‍के मतदान झाले. 18 हजार 28 पैकी 10 हजार 359 जणांनी मतदानाचा हक्‍क बजावला. यात महिला 4916 व पुरुष 5443 यांचा समावेश आहे. मतदानाचा घटलेला टक्का कोणाच्या पथ्थ्यावर पडणार आणि कोणाचा तोटा होणार हे आजे (ता. 30) स्पष्ट होणार आहे. 

नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीसाठी सहा उमेदवार नशिब आजमावत आहेत; मात्र उमेदवार वेगळे असले तरी ही निवडणूक दरवेळेप्रमाणे नारायण राणे विरुद्ध दीपक केसरकर अशीच झाल्याचे चित्र आहे. यामुळे भाजपचे उमेदवार संजू परब व महाविकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर यांच्यात चुरस होण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसचे ऍड. दिलीप नार्वेकर, भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार सौ. अन्नपूर्णा कोरगावकर आणि अपक्ष लढत असलेले माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही आव्हान उभे केले आहे. 

चुरस असूनही मतदारांत निरुत्साह

चुरस असूनही सुरूवातीपासून मतदारांमध्ये निरुत्साह दिसत होता. मतदानाला सकाळी सात वाजता प्रत्यक्षात सुरवात होऊनही एकूण सतराही मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला. रविवार सुटीचा दिवस असूनही मतदार आपल्या सोईनुसार मतदानावर केंद्रावर येताना दिसत होते. सकाळी अकरानंतर काही मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळाली; मात्र अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा मतदानावेळी मतदारांचा असलेला उत्साह या वेळी दिसून आला नाही. बाहेरचावाडा येथे 4 नंबर प्रभागात सकाळी अकरानंतर मोठी गर्दी होती. मुस्लिम समाज बांधव बहुसंख्येने असलेल्या या भागात मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्याचे दिसून आले. येथील बूथवरही प्रत्येक पक्षाचे कार्यकर्तेही मोठी गर्दी करून होते. हेच चित्र खासकीलवाडा भागात दिसून आले; मात्र असे असले तरी अपक्ष उमेदवार असलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर यांच्याकडे संघटनेची कमतरता असतानाही प्रत्येक केंद्रावर त्यांच्या कार्यकर्त्यांचे बूथ दिसून आले. 

मतदान शांततेत

दुपारी तीननंतर मतदारांना मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना यश आले. त्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. शहरातील जिमखाना येथील मतदान केंद्रावर किरकोळ बाचाबाची वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. पोलिस निरीक्षक सुनील धनावडे या सगळ्या प्रक्रियेवर स्वतः लक्ष ठेऊन होते. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस तैनात होते. आठ प्रभागांत असलेल्या एकूण सतरा केंद्रावर कुठल्याही प्रकारचा घोळ अथवा मतदान यंत्रात बिघाड झाला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया कुठल्याच अडथळ्याअभावी शांततेत पार पडली. 
निवडणुकीत रिंगणात असलेल्या संजू परब, बाबू कुडतरकर, ऍड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, अमोल साटेलकर व अन्नपूर्णा कोरगावकर यांनी दिवसभर संपूर्ण शहरात प्रत्येक बूथवर जात मतदानाचा कल जाणून घेतला. आमदार नीतेश राणे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनीही बूथवर जात कार्यकर्त्याशी हितगुज केले. 

मतदारांना डोकेदुखी 

निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडली तरी मतदार यादीतील घोळाचा फटका प्रकर्षाने जाणवला. अनेक मतदारांचे मतदान केंद्रच बदलल्यामुळे त्यांच्यासाठी डोकेदुखी झाली. एकच नंबर दोन व्यक्तींच्या नावे असल्याने नाव शोधताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. एकूणच प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा फटका मतदारांना बसला. 
 

मतदानाची टक्‍केवारी 

  • साडेसात ते साडेनऊ - 8.90 
  • साडेनऊ ते साडेअकरा- 22.01 
  • साडेअकरा ते दीड - 35.50 
  • दीड ते साडेतीन 45.00 
  • साडेतीन ते साडेपाच - 57.46 
     

आज ठरणार सावंतवाडीचा नगराध्यक्ष 

येथील जिमखाना मैदानावर बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. तत्पूर्वी सात वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यत शिवाजी चौक ते महालक्ष्मी भोजनालय पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. शिवाय प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांसाठी थांबण्यासाठी जागाही निश्‍चित करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सांगितले. 

परब विजयी होतील
नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत मतदारांना सत्तांतर हवे आहे. त्यामुळे आमचा विजय हा निश्‍चित असून संजू परब मोठ्या मताधिक्‍याने विजयी होतील. 
- नीतेश राणे, भाजप आमदार 

कुडतरकर विजयी होतील
""सावंतवाडीतील जनतेने पंचवीस वर्ष आम्हाला सत्ता दिली. माझ्या मंत्रिपदाच्या काळात या शहरासाठी आणलेला निधी मी जनतेसमोर नेला आहे. त्यामुळे कोणीही कितीही आमिषे दाखविली तरी त्या पलीकडे जाऊन मतदार मतदान करणार असून पुन्हा एकदा ते शांत, संयमी व सुसंस्कृत सावंतवाडीसाठी खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर यांना विजयी होणार आहेत. 
- दीपक केसरकर, आमदार शिवसेना 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com