esakal | फालतू धमक्या ऐकणार नाही; दीपक केसकरांचे प्रत्युत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

फालतू धमक्या ऐकणार नाही; दीपक केसकरांचे प्रत्युत्तर

फालतू धमक्या ऐकणार नाही; दीपक केसकरांचे प्रत्युत्तर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सावंतवाडी : गोव्यात आमच्या किती जमिनी आहेत हे आमदार नितेश राणे यांनी भिंग घेऊन शोधावे आणि ईडीच काय कुठल्याही एजन्सीकडून माझी चौकशी लावावी. फालतू धमक्या ऐकून घेणार नाही आणि सहनही करणार नाही. त्यांनी वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा त्यांनी कोठे भ्रष्टाचार केले हे पुराव्यानिशी बाहेर काढू, असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी आज दिला. तसेच संजू परब यांनीच शिवसेना प्रवेशासाठी २ कोटी ७० लाख मागितले होते, असा आरोपही त्यांनी केला.

आमदार केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, ``एमटीडीसी हे स्वतंत्र महामंडळ आहे. त्यांच्या अखत्यारीत येणारी सर्व कामे ही या महामंडळाच्या माध्यमातूनच होत असतात. त्यांच्याशी नगरपालिकेचा कोणताही संबंध येत नाही. त्यामुळे परब यांच्याप्रमाणेच आमदार राणे यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा त्यावेळी या खात्याचे मंत्री असलेल्यांवर करावे. केवळ राजकारण म्हणून त्यांचा हा डाव आहे. नगराध्यक्ष परब यांना आपण एक महिन्याचा इशारा दिला होता; मात्र परब यांनी आमदारांना घेऊन पुन्हा आरोप केले. त्यामुळे गप्प बसणार नाही.

हेही वाचा: केसरकरांनीच सेटलमेंटसाठी दिली होती ऑफर; परब यांचा गौप्यस्फोट

नारायण राणे यांच्यासोबत मी संघर्ष केला. आता त्यांचा मुलगा संघर्षासाठी पुढे येत आहे. माझ्यावर खोटे आरोप करत आहे; मात्र अंगावर आले तर शिंगावर घेण्याची माझी तयारी आहे. त्यांनी जमिनीसंदर्भात केलेले चुकीचे आरोप सिद्ध करावे. गोव्यात आमच्या असलेल्या जमिनी या आमच्या आजोबांनी खरेदी केल्या आहेत. त्यावेळी नितेश राणे यांचा जन्मही झाला नव्हता. आज बेळगाव, आजगाव येथील कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी विकून मी राजकारण करत आहे.

आज कोट्यवधीचे कर्ज माझ्या अंगावर आहे. माझ्या कुटुंबाबद्दल येथील जनतेला प्रेम आहे आणि हेच प्रेम पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे फालतू धमक्या ऐकून घेणार नाही. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी आणि आपले वक्तव्य मागे घ्यावे. हा वाद इथेच मिटेल. अन्यथा १५ दिवसानंतर त्यांनी केलेल्या सर्व आरोपांना योग्य उत्तर देईन.`` जिल्ह्यात खासगी गुंतवणूक करा याबाबत अनेकांना सांगितले तसेच अनेकांना या जिल्ह्यात आणले. जॅकी श्रॉफ यांनाही खासगी गुंतवणुकीसाठी आणले होते. यात भ्रष्टाचाराचा विषय येत नाही. त्यामुळे काय बोलावं आणि कुठे बोलावं याचा विचार राणेंनी करावा, असेही ते म्हणाले.

...तर राजकीय लढाई लढू

नारायण राणे यांनी यापूर्वी माझ्यासोबत राजकीय लढाई सुरू केली होती आणि ती लढाई मी जिंकली. आता त्यांच्या मुलाने राजकीय संघर्ष माझ्यासोबत करायला सुरुवात केली आहे. त्यांना राजकीय लढाई करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी. आपलीही तयारी आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा: Konkan Rain Update - मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

परब यांनी मागितले होते २ कोटी

परब यांनी शिवसेनेत येण्यासाठी तब्बल दोन कोटी ७० लाखाची मागणी केली होती. याबाबतची बैठक कुडाळ येथील एका डॉक्टरांच्या घरी झाली होती. मागणी केलेल्या दोन कोटी ७० लाखांपैकी ७० लाख रुपये आगाऊ आणि उर्वरित दोन कोटी रुपये मागावून मागितले होते; मात्र आपण कोणाकडून पैसे घेत नाही, त्यामुळे तुला पैसे देऊ शकत नाही, असे सांगितल्यावर `मंत्री असूनही तुम्ही स्वच्छ राहू शकतात?` असे म्हणणारे संजू परबच होते. त्यांनी मला दिलेले वचन मोडले तरी चालेल; परंतु स्वतःच्या मुलांची शपथ घेऊन खासदार विनायक राऊत यांना दिलेले वचन मोडलं हे चुकीचे आहे.``

loading image