मी मंत्री असेन नसेन; परंतु सहा महिन्यात हवा "रिझल्ट'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

मी बोलताना रफ बोलतो; परंतु कोणत्याही अधिकाऱ्याचे वाईट केले नाही. त्यामुळे लोकांचे चांगले आशीर्वाद घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.

- दीपक केसरकर

सावंतवाडी - चांदा ते बांदा योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. यापुढे मी मंत्री असेन नसेन; परंतु सहा महिन्यात "रिझल्ट' दिसला पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या.

मी बोलताना रफ बोलतो; परंतु कोणत्याही अधिकाऱ्याचे वाईट केले नाही. त्यामुळे लोकांचे चांगले आशीर्वाद घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही केसरकर म्हणाले.

जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री केसरकर यांनी आज येथील पर्णकुटी विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, सहाय्यक उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र दळवी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी गजानन भोसले, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर यांनी खातेनिहाय अधिकाऱ्यांचा आढावा घेतला. यात तालुक्‍यातील चांदा ते बांदा या योजनेतून 2017-18, 2018 -19 आणि 19- 20 या आर्थिक वर्षातील कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत. कोणतेही काम निधीअभावी किंवा निधी परत जाता नये, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या.

श्री. केसरकर म्हणाले, ""येणाऱ्या सहा महिन्यात आपल्याला जिल्ह्यात चांगले काम करायचे आहे. विकासकामे करून लोकांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. यापुढे मी मंत्री असेल किंवा नसेल; परंतु येणाऱ्या काळात वेगळा जिल्हा दिसणे गरजेचे आहे. काय तो चमत्कार करा आणि विकास योजना राबवा.''

मनोहर मन संतोष गड विकासाच्या सुचना

यावेळी मनोहर मन संतोष गडावर जाण्यासाठी पायऱ्या आणि रस्ते बांधण्याच्या सूचना केल्या. तेथे पर्यटकांची संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. त्यामुळे वुडन कॉटेज टेन्ट आदी उभारता येऊ शकतात का? यासाठी परिसरात पाहणी करा व याबाबतचा अहवाल तात्काळ आपल्याला द्यावा.'', असेही केसरकर यांनी सांगितले.

चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोंबड्यांची पिल्ले देण्याबाबत चर्चा झाली. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांसह भाडेकरू व्यक्तीला द्या सातबाराची अट शिथिल करा, असे श्री. केसरकर यांनी सांगितले. आंबोली येथे समिती यांच्यावतीने औषधी वनस्पती लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आवश्‍यक असलेला प्रस्ताव द्या. त्याचबरोबर फुलपाखरू उद्यान या दोन्ही प्रकल्पांना आपण पैसे दिले आहेत ते तात्काळ खर्च करून हे प्रकल्प पूर्ण करा, असेही श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

सुरंगीपासून रंग तयार करणार 
पालकमंत्री केसरकर म्हणाले, ""जिल्ह्यात सुरंगीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते; परंतु हा व्यवसाय करणाऱ्या लोकांना फसवण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सुरंगीपासून पिवळा रंग तयार करण्याचा प्रकल्प जिल्ह्यातच उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथील लोकांना रोजगार मिळण्यास फायदा होणार आहे.

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepak Kesarkar comment