राणे, विकासाच्या गंगेत सामिल व्हा; अन्यथा अडगळीत पडाल: दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

आतापर्यंत जिल्ह्यासाठी 2700 कोटी रुपयांचा निधी मी आणला आहे. मात्र कधीही राणेंनी माझे साधे कौतुकही केले नाही. केवळ विरोधासाठी विरोध करणे हेच त्यांचे काम आहे. त्यांनी ही सवय टाळून वडीलधारे म्हणून मला आशिर्वाद द्यावेत

सावंतवाडी - "विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा आतातरी विकासाच्या गंगेत सामिल व्हा अन्यथा कुठल्या कुठे अडगळीत पडाल,' असा सल्ला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांना आज (रविवार) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

"राणेंचा जिल्ह्याचा विकास करण्याचा उद्देश चांगला होता. परंतू नेमके काय करायचे हेच त्यांना कळले नाही. अनेक प्रकल्प आणले, परंतु त्याला निधीच नाही अशी अवस्था होती. त्यामुळे त्यांनी केलेली कर्मे मला निस्तारावी लागत आहेत,'' अशी टीका केसरकर यांनी केली. केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. गेल्या काही दिवसात नारायण राणेंकडून झालेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.

केसरकर म्हणाले,“आतापर्यंत जिल्ह्यासाठी 2700 कोटी रुपयांचा निधी मी आणला आहे. मात्र कधीही राणेंनी माझे साधे कौतुकही केले नाही. केवळ विरोधासाठी विरोध करणे हेच त्यांचे काम आहे. त्यांनी ही सवय टाळून वडीलधारे म्हणून मला आशिर्वाद द्यावेत. आपण सर्वांनी एकत्र येवून जिल्ह्याचा विकास करू. राणेंनी काढलेले कॉलेज ही अन्य लोकांप्रमाणेच आहे. त्या ठिकाणी डोनेशन किंवा फी घेवून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांसाठी शासकीय महाविद्यालये व्हावी यासाठी माझे प्रयत्न आहेत. राणेंनी शंभर महाविद्यालये काढली तरी माझा विरोध असणार नाही. मात्र जिल्ह्याच्या विकासासाठी मी झटत राहणार आहे''

"मच्छीमारांचा कॅप्टन अशी टीका राणे यांनी केली होती. मला गोरगरीबांचा कॅप्टन होणे आवडेल. राणेंची दादागिरी आता जिल्ह्यात चालणार नाही. इतके दिवस त्यांच्याकडून कायद्याचा भंग करण्यात आला. परंतू आता मत्स्याधिकार्‍याला मारहाण झाल्यानंतर नितेश राणेंना अटक करावी लागली. याचा अर्थ जिल्ह्यात कायदा पूर्वपदावर आला आहे असा होतो.”

Web Title: Deepak Kesarkar warns Narayan Rane