बेसुमार जंगलतोड रानमेव्याच्या मुळावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

जंगलतोडीमुळे पशु-पक्ष्यांचे खाद्य नष्ट झाल्याने त्यांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे जंगली श्वापदे शेतकऱ्यांच्या शेताकडे वळू लागली. परिणामी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी शेती करण्याचे सोडून आपल्या जमिनी ओसाड ठेवल्या आहेत. वातावरणात उष्मा वाढला आहे.
- संजय रेवाळे, पर्यावरणप्रेमी

मंडणगड - संपूर्ण तालुक्‍यात बेसुमार जंगलतोड सुरू असून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या वृक्षतोडीने वनसंपदेने नटलेल्या निसर्गाचा तालुक्‍यात ऱ्हास होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. जंगलातील रानमेवा, औषधी वनस्पती दुर्मिळ झाल्या आहेत. संबंधित खाते हे सारे डोळ्यावर पट्टी ओढून दृिष्टआड करीत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही जंगलतोड रानमेव्याच्या मुळावर आली आहे.

वन विभागाकडून याबाबत जनजागृती रॅली, शाळा महाविद्यालयांतून झाडे लावा झाडे जगवा असा नारा दिला जातो. झाडांचे महत्त्व पटवून दिले जाते. शासन दरवर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वन विभागाला ठरवून देते. त्याप्रमाणे वृक्षलागवडही होते. मात्र, प्रत्यक्षात जंगलतोड झालेल्या ठिकाणी पुन्हा झाडे लावली आहेत का, हे बघण्याची साधी तसदीही खात्याकडून घेतली जात नाही. मंडणगड तालुक्‍यात जंगलाचे क्षेत्र मोठे आहे. पावसाळ्यात सौंदर्याने नटलेले येथील डोंगर उघडे बोडके दिसत आहेत. दिवसागणिक वाढत चाललेली जंगलतोड करवंद, जांभूळ, चिंच, अळू, अटुर्ली, रायवळ आंबे अशा रानमेव्याच्या मुळावर आली आहे. पक्षांना घरटी बांधण्यासाठी सुरक्षित झाडे मिळत नाही. त्यांची निवासस्थाने नष्ट झाली आहेत. रानमेवा कमी झाल्याने खाण्याचे हाल होऊ लागले आहेत. जंगली श्वापद गावातील वस्तीकडे वळत आहेत. एप्रिल महिन्यातच याआधी कधी जाणवला नव्हता एवढा उन्हाळा आहे. तालुक्‍यातील तापमान ३७ अंशाच्या पुढे गेले आहे. दरवर्षी या हंगामात शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रानमेवा दाखल होत असतो. यंदा मात्र रानमेव्यामध्ये घट झाली आहे. ग्रामीण भागातील अनेकजण रानमेव्याने भरलेल्या टोपल्या घेऊन दाखल होत असतं. मात्र, यंदा हे प्रमाण कमी झाले आहे. जंगलतोडीमुळे रानमेवा उपलब्ध होत नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Deforestation in mandangad