दुधाची तहान ताकावर ; गरज सहाशे शिक्षकांची आणि उपलब्ध मात्र दहाच

राजेश कळंबटे
Tuesday, 6 October 2020

जिल्ह्यात सुमारे 600 शिक्षकांची आवश्यकता असून दहाच पदवीधर शिक्षक उपलब्ध आहेत.

रत्नागिरी : जिल्हा परिषद शाळांमधील सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित विषय शिकवणार्‍या पदवीधर शिक्षकांची जिल्ह्यात कमतरता आहे. जिल्ह्यात सुमारे 600 शिक्षकांची आवश्यकता असून दहाच पदवीधर शिक्षक उपलब्ध आहेत. पर्याय म्हणून उपशिक्षकांकडे जबाबदारी देत, दुधाची तहान ताकावर भागविण्याची वेळ आली आहे. पाया मजबूत करण्यासाठी शासनाकडून यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

हेही वाचा - खेड तालुक्‍यात कोरोना अजूनही 88 गावांच्या वेशीबाहेरच 

जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळा असून त्यातील 900 शाळा या 1 ते 7 वी पर्यंतच्या आहेत. जिल्ह्यात सुमारे पावणेसहा हजार शिक्षक आहेत. प्राथमिक शिक्षण विभागात भाषा, समाजशास्त्र आणि विज्ञान-गणित अशा तीन विभागांसाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार रिक्त पदांचा संच तयार केला जातो. जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची 1800 पदे मंजूर आहेत. त्यातील गणित-विज्ञान विषयासाठी 600 पदवीधर शिक्षकांची गरज आहे. रिक्त पदांनुसार जाहीरात काढण्यात येते. 

जिल्ह्यात उपशिक्षकांची पदे अधिक भरण्यात आलेली आहेत. सध्या सुमारे 250 पदे रिक्त असून ऑनलाईन पोर्टलद्वारे भरली जाणारी पदे पावणेतीनशे आहेत. या सर्व जागांवर पदवधीर शिक्षकांची अपेक्षा आहे. ती पदे भरण्यात आली तरच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित विषयातील तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध होतील. जि. प. शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येतात; परंतु तज्ज्ञ शिक्षक भरतीबाबत शासन आवश्यक निर्णय घेत नाही.

हेही वाचा - १२० एकर भात शेतीचा फक्त पेंढाच हाताशी ; भातावर पीस रोगाचा परिणाम 

पर्यायी व्यवस्था

पदवीधर शिक्षक कमी पडत असले तरीही शिक्षण विभागाने काही उपशिक्षकांची नियुक्ती गणित व विज्ञान विषय शिकवण्यासाठी केली आहे. ते तात्पुरत्या स्वरुपात काम करत आहेत. बहूतांश शिक्षक 12 वी डीएड करतात. त्यामुळे सातवीपर्यंतचे हे दोन्ही विषय ते शिकवू शकतात.
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: degree holders teachers not available in konkan need 600 teachers but available only 10 in ratnagiri