esakal | खेर्डी औद्योगिक वसाहतीत 9 कामगारांना डेंग्यू
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

खेर्डी औद्योगिक वसाहतीत 9 कामगारांना डेंग्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : सर्वत्र गणेशोत्सवाचा माहोल असतानाच शहरालगतच्या खेर्डी येथील औद्योगिक वसाहतीतील नऊ कामगारांना डेंगीची (Dengu) लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेमुळे आरोग्य विभागाची तारांबळ उडाली असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव (Jyoti Yadav) यांनी या भागात तत्काळ सर्वेक्षणाबरोबरच फॉगिंग करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले.

कामथे उपजिल्हा रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉ. यादव यांनी दिली. २२ जुलैच्या महापुरानंतर चिपळूण शहर परिसरात डेंगी तसेच डेंगीसदृश रुग्ण आढळून आले होते; मात्र नगरपालिका व आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतल्याने शहरात डेंगीची साथ पसरली नव्हती. चिपळूण तालुक्यात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार येथील तालुका आरोग्य विभागामार्फत गावी आलेल्या चाकरमान्यांची कोरोना चाचणी करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. याशिवाय लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे.

संपूर्ण यंत्रणा या कामात व्यग्र असतानाच गुरुवारी शहरालगतच्या खेर्डी एमआयडीसी परिसरातील नऊ कामगारांना डेंगीची लागण झाल्याचे उघड झाल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली. तत्काळ या रुग्णांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे कामगार एका बेकरीमधील असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे

हेही वाचा: औद्योगिक वसाहतीत कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग

मलेरिया विभागाची टीमही दाखल

परिसरात डेंगीची साथ पसरू नये यासाठी शुक्रवारी आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण करून आजूबाजूच्या भागाचे फॉगिंग करण्यात आले. तसेच जिल्हा मलेरिया विभागाची टीमही दाखल होऊन पाहणी करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी दिली.

loading image
go to top