प्रशासनाचा निर्णय : अखेर ‘त्या’ अधिकाऱ्याची झाली बदली...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

संबंधित उपकार्यकारी अभियंता यांनी वर्षभरापुर्वी येथील कार्यभार स्वीकारला होता.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : येथील विज वितरणचे उपकार्यकारी अभियंत्याची कुडाळ येथे तात्पुरती बदली केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ग्राहक, लोकप्रतिनिधीमध्ये नाराजी होती. त्याचे पडसाद अनेक सभांमधून उमटले होते. दरम्यान, येथील उपविभागाचा कार्यभार देवगडचे उपकार्यकारी अभियंता जयकुमार कथले यांच्याकडे सोपविला आहे.

हेही वाचा-अटकपूर्व जामीन फेटाळला, तुरुंग अधीक्षक अडचणीत, काय आहे प्रकरण? -

संबंधित उपकार्यकारी अभियंता यांनी वर्षभरापुर्वी येथील कार्यभार स्वीकारला होता. त्यांची कार्यशैली अतिशय वेगळी असल्यामुळे सतत त्यांच्याविरोधात ग्राहकांच्या तक्रारी होत्या. तालुक्‍यातील जीर्ण वीजखांब, वाहिन्यांवरील झाडी तोडणे, ट्रान्सफार्मर बसविणे, अशी अनेक कामे तालुक्‍यात प्रलंबित होती. हे विषय सातत्याने विकासकामांच्या आढावा सभेत उपस्थित केले जात होते. ग्राहक, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे पदाधिकारीही त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. नुकत्याच पंचायत समितीच्या सभागृहात पालकमंत्री आणि आमदारांनी घेतलेल्या आढावा सभेत अनेकांनी त्यांच्याविरूद्ध तक्रारीचा पाढा वाचला होता. 

हेही वाचा- मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला ; उडाली दाणादाण -

तालुका भाजपाच्यावतीने तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनीही कार्यकारी अभियंत्याकडे त्यांच्या बदलीची लेखी मागणी केली होती. दरम्यान, अधीक्षक अभियंता रत्नागिरी यांनी ३० जुलैला त्यांची कुडाळ येथे प्रतिनियुक्ती केली आहे. पुढील आदेश होईपर्यंत त्यांनी तेथेच काम करायचे आहे. तोपर्यंत येथील उपविभागाचा कार्यभार देवगडचे श्री. कथले यांच्याकडे देण्याचे आदेश दिले आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Executive Engineer of Power Distribution temporarily transferred to Kudal