संपाला हिंसक वळण, अज्ञातांकडून एसटींची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

मालवण : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण लागले आहे. पहिल्या दिवशी फोंडाघाट व कुडाळ येथे एसटी बसचे नुकसान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मालवण तालुक्यात दोन ठिकाणी अज्ञात दुचाकीस्वारांकडून कुडाळ आगाराच्या दोन बसची दगड मारून तोडफोड करण्यात आली. संपाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिसांकडून बसस्थानकावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मालवण-कुडाळ मार्गावर गस्त घालण्यात येत होती. 

मालवण : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण लागले आहे. पहिल्या दिवशी फोंडाघाट व कुडाळ येथे एसटी बसचे नुकसान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मालवण तालुक्यात दोन ठिकाणी अज्ञात दुचाकीस्वारांकडून कुडाळ आगाराच्या दोन बसची दगड मारून तोडफोड करण्यात आली. संपाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिसांकडून बसस्थानकावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मालवण-कुडाळ मार्गावर गस्त घालण्यात येत होती. 

दरम्यान, तालुक्यातील आनंदव्हाळ व धामापूर-कासारटाका मार्गावर दोन बसची अज्ञातांनी तोडफोड केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. अज्ञातांकडून सुरू असलेल्या दगडफेकीच्या घटनामुळे प्रवाशांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत केलेली घोषणा मान्य नसल्याने राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदाच अघोषित संपाचे हत्यार उगारले. या संपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचाही प्रतिसाद लाभला. पूर्वसूचना न देता संप पुकारल्याने प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थी यांना मोठा फटका बसला. संपाच्या पार्श्वभूमीवर मालवण बसस्थानक येथे गेले दोन दिवस पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. कुडाळ आगाराच्या बसफेऱ्या सुरू असल्याने तुरळक प्रवासी संख्या बसस्थानक परीसरात होती. 

कुडाळ आगाराच्या दोन बसचे नुकसान
मालवणात पहिल्या दिवशी संप शांततेत सुरू राहीला. तर दुसऱ्या दिवशी काहीसे हिंसक वळण लागले. कुडाळ आगाराची कुडाळ-मालवण ही बस सुरक्षित मालवणला आली. मात्र कुडाळच्या दिशेने माघारी जात असताना आनंदव्हाळ पुलानजीक अज्ञात दुचाकीस्वारांनी बसवर (एमएम २० डी/ ९४३८) दगडफेक केली. यात बसच्या दर्शनी भागाची काच फुटून नुकसान झाले. तर कुडाळच्याच दुसऱ्या बसवर (एमएच १४ बीटी / १४३८) धामापूर कासारटाका येथे अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. यात बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. तोडफोड करण्याचा प्रकार आज सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडला. 

अज्ञातांवर गुन्हा दाखल
एसटी बसचे नुकसान झाल्यानंतर येथील प्रभारी पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, हवालदार नीलेश सोनावणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चालक व वाहक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बसस्थानक परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस उपनिरीक्षक मोमीन, अमोल महाडिक, सुरजसिंग ठाकूर, भक्ती शिवलकर आदी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता.

Web Title: destroy st by unknowns strike became violent