वॉटर स्पोर्टस्‌ सुरूच ठेवण्याचा निर्धार

Determination to continue water sports Sindhudurg district
Determination to continue water sports Sindhudurg district

मालवण (सिंधुदुर्ग)-  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आम्ही वॉटर स्पोर्टस्‌ व्यवसाय सुरू केला. कोरोना काळात ठप्प असलेला वॉटर स्पोर्टस्‌ व्यवसाय पुन्हा एकदा पूर्वपदावर येत असताना बंदर विभाग आडमुठे धोरण राबवून आमच्यावर कारवाई करणार असेल, तर खुशाल कारवाई करा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नियमांचे पालन करत आम्ही आमचे व्यवसाय सुरूच ठेवणार, अशी भूमिका येथील वॉटर स्पोर्टस्‌ व्यावसायिकांनी बंदर अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली. 

केवळ बंदर विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कोरोना खबरदारी नियमावली प्राप्त नाही, असे कारण पुढे करून वॉटर स्पोर्टस्‌ बंद करा, असे आदेश दिले जात असतील. अनेकांचे रोजगार हिरावले जात असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही व्यवसाय सुरूच ठेवणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व नियमांचे पालन करून आम्ही केलेला व्यवसाय, दिलेली पर्यटन सेवा बंदर विभाग अनधिकृत ठरवत असेल, तर आम्ही कारवाईस तयार आहोत. मात्र, वॉटर स्पोर्टस्‌ सुरूच राहणार, असेही पर्यटन व्यावसायिकांनी स्पष्ट केले. 

बंदर विभागाच्या बंदी आदेश व कारवाई भूमिकेविरोधात मालवण, तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला येथील शेकडो पर्यटन व्यावसायिकांनी बंदर कार्यालयावर धडक देत, भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशाने वॉटर स्पोर्टस्‌ बंद ठेवण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी सांगितले. 
यावेळी पर्यटन व्यावसायिक अन्वय प्रभू, सतीश आचरेकर, मनोज मेथर, फान्सिस फर्नांडिस, बाबली चोपडेकर, राजन कुमठेकर, मनोज खोबरेकर, रमेश कद्रेकर, वैभव खोबरेकर यासह शेकडो व्यावसायिक उपस्थित होते. महेश जावकर, दिलीप घारे यासह कॉंग्रेसचे बाळू अंधारी व अरविंद मोंडकर यांनीही व्यावसायिकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. बंदर विभागाच्या मार्गदर्शक सूचना (एसओपी) सोमवारपर्यंत मिळण्यासाठी आम्हीही मंत्री स्तरावर पाठपुरावा करत असल्याचे मोंडकर यांनी सांगितले. 

नियमांचे पालन करू 
आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. पुन्हा बंदी आल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. पूर्वपदावर आलेले पर्यटन ठप्प होईल. या परिस्थितीचा विचार करता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कोरोना खबरदारी नियमानुसार पर्यटकांच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेत पर्यटन व्यवसाय सुरू ठेवणार असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी स्पष्ट केले. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com