पाण्यासाठी देवगडात ‘आक्रोश’

विजयदुर्गवासीयांचे आंदोलन; पाणी समस्येकडे वेधले प्रशासनाचे लक्ष
Water scarcity
Water scarcitysakal

देवगड : विजयदुर्ग परिसरात नळयोजनेचा पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर ''आक्रोश घागर मोर्चा'' काढला. मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या तीव्र भावना प्रशासनासमोर मांडल्या. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता उदयकुमार महाजनी यांना विजयदुर्ग ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले. ग्रामस्थांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाने आश्‍वासित केल्यानंतर ग्रामस्थ माघारी परतले.

वारंवार उद्भवणाऱ्या पाणी समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने यापूर्वी पुढे ढकलण्यात आलेला आक्रोश घागर मोर्चा आज काढण्यात आला. ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे, टंचाई भासता नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामस्थांसोबत प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता महाजनी यांनी चर्चा केली.

यावेळी विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये, शीतल पडेलकर, वर्षा लेले, संजना आळवे, वैशाली पडेलकर, दिलीप शिंदे, कृष्णकांत जावकर, नीलेश मणचेकर, नंदा जावकर, मनोहर बिर्जे, रजनी कोयंडे, विठाबाई बांदकर, सुगंधा डोंगरे यांच्यासह अन्य उपस्थित होते. वारंवार मागणी करूनही अपेक्षित यश मिळत नसल्याने यापूर्वी स्थगित केलेला घागर मोर्चा पुन्हा काढणार असल्याचे निवेदन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले होते. त्यानुसार आज येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात विजयदुर्ग ग्रामस्थ दाखल झाले.

यात महिलांचाही समावेश होता. हातात घागर घेऊन मोर्चा काढण्यात आला. विजयदुर्ग समुद्र व खाडीकिनारी वसले आहे. त्यामुळे तेथे गोड्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. तेथील ग्रामपंचायत नळयोजना कार्यान्वित आहे; मात्र त्याचे पाणी येथील सर्व वाड्यांना पुरेसे मिळत नाही. शिवाय फेब्रुवारीपासून पातळी कमी होत असल्याने खूपच गैरसोय होते. दुसरा पाण्याचा स्रोत नसल्याने विजयदुर्ग प्रादेशिक नळयोजनेवर अवलंबून राहावे लागते. विजयदुर्ग प्रादेशिक नळयोजनेचे पाणी बिल ग्रामपंचायतीमार्फत वेळच्यावेळी भरणा केले जात असतानासुद्धा दुर्लक्ष होत आहे. छत्रपती संभाजी महाराज सभागृहात श्री. महाजनी आणि श्री. चव्हाण यांनी संवाद साधला. या वेळी चर्चेअंती आंदोलनकर्ते माघारी परतले.

ग्रामस्थ म्हणतात

खाडीकिनारी गाव असल्याने दुर्भिक्ष्य

गणेश चतुर्थीपासून पाणीपुरवठा अनियमित

रमजान महिना सुरू असल्याने पाण्याची गरज

मोर्चाचा इशारा दिला की घेतात दखल

पाणी बिल वेळेत भरूनही दुर्लक्ष का?

दुसरा पाण्याचा स्रोत नसल्याने हाल

विजयदुर्ग ग्रामस्थांची पाण्यावाचून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. विजयदुर्गला सुमारे ३ लाख ५५ हजार लिटर साठवण क्षमतेची पाण्याची टाकी आहे. आठवड्यातील तीन दिवस टाकी भरून पाणी दिले जाईल. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल.

- उदयकुमार महाजनी, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com