"देवगड हापूस'ची धिमी सुरूवात 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

यंदा सुरूवातीला पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले; मात्र नंतर अवकाळी पावसाचा मुक्‍काम लांबला आणि वातावरण शेतीविरोधी बनले. समुद्री वादळाने वातावरणातील तापमानात चढउतार होत राहिला. त्यामुळे परतीच्या पावसाने जोर धरला.

देवगड ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यात कमी -अधिक प्रमाणात थंडी पडण्यास सुरूवात झाल्याने आंबा कलमे मोहरत आहेत. धिम्यागतीने यंदाच्या "देवगड हापूस' हंगामाची चाहूल लागली आहे. कलमांना मोहोर येऊ लागल्याने फवारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. काही भागात कैऱ्याही दिसू लागल्या आहेत; मात्र रोजचे बदलते वातावरण बागायतदारांच्या चिंतेत भर घालीत आहे. 

हेही वाचा - कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मुंबईत होणार या तारखेला परिषद

यंदा सुरूवातीला पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले; मात्र नंतर अवकाळी पावसाचा मुक्‍काम लांबला आणि वातावरण शेतीविरोधी बनले. समुद्री वादळाने वातावरणातील तापमानात चढउतार होत राहिला. त्यामुळे परतीच्या पावसाने जोर धरला. हंगामाच्या अपेक्षेने काही बागायतदारांनी वापरलेली संजीवके वाया जाण्याची वेळ आली. त्यामुळे सुरूवातीलाच बागायतदारांना व्यवस्थापनाच्या वाढीव खर्चाला सामोरे जावे लागण्याची स्थिती निर्माण झाली. बदलत्या वातावरणामुळे तसेच लांबलेल्या पावसाच्या मुक्‍कामाचा फटका बसण्याची लक्षणे दिसू लागली. थंडीची शक्‍यता दिसत नसल्याने यंदाचा आंबा हंगाम लांबवण्याची लक्षणे दिसू लागली होती; मात्र आता किनारपट्टीवर आंबा हंगामाला पोषक वातावरण तयार होऊ लागल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - जाधव यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने यांच्या जबाबदारीत वाढ 

तुरळक प्रमाणात मोहोरावर कैऱ्या

वाराही सुटत आहे. बदलते वातावरण आंबा बागायतदारांच्या दृष्टीने काहीसे सुखावह ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. झाडांमधून निर्धोक मोहोर बाहेर पडण्यासाठी बागायतदारांनी फवारणी सुरू केली आहे. काही प्रगतिशील आंबा बागायतदारांचे फवारणीचे नियोजन यापुर्वीच सुरू झाले आहे. तालुक्‍याच्या काही भागात आंबा कलमे मोहोरण्यास सुरूवात झाली. प्रयोगशील बागायतदारांच्या बागेत मोहोर दिसू लागला आहे. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात मोहोरावर कैऱ्याही दिसत आहेत. बागायतदारांचे फवारणीचे नियोजन सुरू झाल्याने यंदाच्या "हापूस' हंगामाची चाहूल लागली आहे. 

नव्या मोहोरातून कितपत फलधारणा ?
झाडावरील जून पालवीतून मोहोर येण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस वगळता सध्याचे वातावरण हंगामाच्या दृष्टीने ठीक आहे. आंबा कलमे मोहरू लागल्याने यंदाच्या हंगामाची चाहूल लागली आहे. फवारणीला सुरूवात झाली. काही ठिकाणी तुरळक कैऱ्या आहेत; मात्र नव्याने आलेल्या मोहोरातून कितपत फलधारणा होईल हे पहावे लागेल. 
- विनायक पारकर, ज्येष्ठ आंबा बागायतदार, वरेरी  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devgad Hapus Flowering Slowly Sindhudurg Marathi News