घरपरड्यातून हळद आता शेतमळ्यात जायला हवी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

जागतिक स्तरावर मागणी वाढल्याने दर वाढणार; कोकणात शेतकरी हळूहळू वळू लागलाय
देवरूख - बहुगुणी आणि बहुपयोगी औषधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या मागणीत जागतिक स्तरावर वाढ झाल्याने तसेच पुरवठा आणि मागणी यामधील तफावत असल्याने हळदीचे भाव १०० वरून २०० रुपये किलोवर गेले आहेत. कोकणातील शेतकऱ्यांनी इतर शेतीप्रमाणेच हळद लागवडीखालील क्षेत्र वाढविल्यास शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचे नवे साधन निर्माण होणार आहे.

आयुर्वेदाप्रमाणेच दैनंदिन जीवनातही हळदीचे महत्त्व कमालीचे आहे. अगदी लग्न समारंभापासून ते सौंदर्य प्रसाधनांपर्यंत तसेच नियमित जेवणातही हळदीचे स्थान महत्त्वाचे आहे. कोकणात घरपरड्यात होणारी हळद ही फक्‍त घरगुती आणि औषधी वापरासाठीच उपयोगात येते. 

क्‍वचितप्रसंगी शेतकरी या हळदीची विक्री करतात. काही वर्षांपूर्वी बाजारात हळदीचा दर ७० रुपये किलो होता. तोच दर अचानक २०० वर जाऊन पोचला होता. नंतरच्या कालावधीत मात्र हाच दर १३० ते १५० वर येऊन स्थिरावला होता. आता मात्र पुन्हा दर वाढला असून तो १९० ते २०० रुपयांच्या घरात गेला आहे. बाजारी हळदीपेक्षा गावठी आणि घरगुती हळदीला मोठी मागणी आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत हमखास हात देऊ शकणाऱ्या या हळदीच्या लागवडीत यावर्षी वाढ झाली असली तरी हळद घरपरड्याऐवजी आता शेतीच्या मळ्यांमध्ये दिसणे आवश्‍यक आहे.

हळदीचे भाव वधारल्याने केवळ महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही हळद लागवडीची वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. हळदीचे उत्पादन वाढले तरच तिचे चढे भाव कमी होणार आहेत. देशात दरवर्षी हळदीचे उत्पन्न सरासरी ४७ लाख पोती एवढे होते. यावर्षी हे उत्पादन घटून ४४ लाख पोती एवढे झाले आहे. परिणामी मागणी जास्ती आणि उत्पादन कमी यामुळे दर वधारत आहेत. यामुळे हळद लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

बचत गटांना उत्तम पर्याय
कोकणात शेतीबरोबरच आता हळद लागवड हा शेतकरी आणि बचत गटांसाठी उत्तम पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. लागवडीपासून सहा महिन्यांत हळद काढणीयोग्य होते. हळदीचे कांदे मातीत लावले जातात.

पावसाच्या पाण्यावरच हे पीक उत्तमरीतीने जोर धरते. यावर रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्याने आणि थोड्याच जागेत चांगले उत्पन्न मिळत असल्याने कोकणातील शेतकऱ्यांनी व्यावसायिकदृष्ट्या हळद लागवडीचा विस्तार केल्यास दिवसेंदिवस वाढणाऱ्या हळदीच्या मागणीला पुरवठा करणे सोपे जाणार आहे.

Web Title: devrukh kokan news The turmeric should go from the house to the field.