मध्यावधीची हवा संपली; भाजपमध्ये सामसूम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

देवरूख - मध्यावधी निवडणुकांची हवा झाली आणि त्यावर पाणीही पडले. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीने पक्षबांधणीसाठी हालचाली सुरू केल्या. काँग्रेसनेही यात संघटनात्मक निवडणुका जाहीर केल्या असल्या तरी राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या गोटात सामसूम आहे. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर भाजपचे कार्यकर्तेही सुस्तावले असून स्थानिक पातळीवर नेतृत्वाचा अभाव असल्याने ही स्थिती आल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जिल्हाभरात सपाटून मार खाणाऱ्या भाजपने संगमेश्‍वर तालुक्‍यात मात्र सत्ताधारी शिवसेनेला चांगलीच लढत दिली. येथे एक पंचायत समिती सदस्याच्या रूपाने भाजपने आपले खाते खोलले, तर त्यांचे तीन उमेदवार थोडक्‍या मतांनी पराभूूत झाले. नगरपालिका निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांतच या निवडणुका लागल्या. यातही भाजपने स्वतंत्र मांड ठोकला त्याचा त्यांना उपयोगही झाला. जिल्हा परिषद निवडणुकानंतर गटनिहाय संघटना बांधणीसाठी प्रदेशस्तरावरचे नेते स्थानिक पातळीवर आले त्यांच्याकडून बूथ कमिट्या नेमण्याबरोबरच सक्रिय सदस्य नोंदणीही करण्यात आली. या गोष्टीला तीन महिने उलटत आले तरी पुढे काहीच हालचाली भाजपच्या गोटात पाहायला 
मिळत नाहीत.

जिल्हा परिषद निवडणुकांमधील मानहानीकारक पराभवानंतर संगमेश्‍वर तालुक्‍याची कार्यकारिणी बदलण्याची हालचाल सुरू झाली होती. यामध्ये विद्यमान तालुकाध्यक्षांना डच्चू देत नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, मात्र निवडणुकीची हवा संपली तसे तालुका कार्यकारिणी बदलाच्या हालचालीही थंडावल्या.

मध्यावधींची शक्‍यता लक्षात घेऊन शिवसेनेने संपूर्ण तालुक्‍यात संघटना बांधणीसाठी कंबर कसली आहे. निवडणुका मध्यावधी होवोत अथवा वेळेवर तरीही त्यांना अवघे दीड वर्षच शिल्लक राहिले आहे. या कालावधीत पुन्हा पक्षबांधणी न झाल्यास स्थानिक पातळीवरील सत्ताधारी शिवसेनेला रोखताना पक्षाची हालत जिल्हा परिषद निवडणुकांसारखी होऊ शकते, असे मत भाजपमधील ज्येष्ठ कार्यकर्ते खासगीत बोलताना व्यक्‍त करीत आहेत.

भाजप स्थानिक स्तरावर थंड
राष्ट्रवादीनेही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह फुंकून त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीनंतर गलितगात्र झालेल्या काँग्रेसनेही तालुका कमिटी निवडण्यासाठी निवडणूक जाहीर केली. मात्र राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या गोटात या निवडणुकांबद्दल स्थानिक स्तरावर काहीच हालचाली नसल्याने राजकीय वर्तुळातून आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

Web Title: devrukh konkan news bjp politics