राणेंचा भाजप प्रवेश झालाच; तर शिवसेनेसमोर आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

देवरूख - कोकणचे नेते नारायण राणे यांनी भाजप प्रवेश केलाच, तर त्याचे पडसाद संगमेश्वर तालुक्‍यातही उमटण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍यात गेले दोन वर्षे तळ्यात-मळ्यात असणारे अनेक कार्यकर्ते आता भाजपची वाट धरणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवरुखात मोठा राजकीय भूकंप होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

देवरूख - कोकणचे नेते नारायण राणे यांनी भाजप प्रवेश केलाच, तर त्याचे पडसाद संगमेश्वर तालुक्‍यातही उमटण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍यात गेले दोन वर्षे तळ्यात-मळ्यात असणारे अनेक कार्यकर्ते आता भाजपची वाट धरणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवरुखात मोठा राजकीय भूकंप होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

राणेंच्या भाजप प्रवेशावरून सध्या राज्याच्या राजकारणात धुमशान सुरू आहे. राणेंनी काँग्रेसमध्ये आवराआवर केली असून त्यांच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता  बाकी असल्याचे बोलले जाते. ऑगस्ट २००५ मध्ये राणे काँग्रेसमध्ये गेले. त्याचे पडसाद लगेच संगमेश्वर तालुक्‍यात उमटले. तेव्हाचे कट्टर राणे समर्थक व सेनेचे आमदार सुभाष बने राणेंसोबत काँग्रेसवासी झाले आणि तालुका शिवसेनेला मोठे भगदाड पडले. रसातळाला गेलेली काँग्रेस पुन्हा शर्यतीत आली. आता राणेंचा भाजपप्रवेश होणार आहे. या वेळी यांच्यासोबत तालुक्‍यातील कोणताही बडा नेता सोबत नसला, तरी राणे समर्थकांची मोठी फौज तालुक्‍यात आहे. हे सर्व कार्यकर्ते भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या कार्यकर्त्यांनी दादा म्हणजेच आमचा पक्ष, असे सांगितले.

राणेसमर्थक वगळता मूळ काँग्रेसमधील काही निष्ठावानही राणेंना मानतात. स्थानिक पातळीवर असलेली काँग्रेसची स्थिती आणि भविष्यात मोदी हेच खंबीर पर्याय असे चित्र यामुळे काही निष्ठावंत काँग्रेसजनही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळेच देवरुखात लवकरच राजकीय भूकंप होणार आहे. संगमेश्वर तालुक्‍यात शिवसेनेसह राष्ट्रवादीची ताकद आहे. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत भाजपने उसळी घेत दुसरा क्रमांक मिळवला. राणेंच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढेल. त्यातून सेनेसमोर मोठे आव्हान उभे राहील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राणेंचा भाजपप्रवेश सेनेसाठी धोक्‍याची घंटा ठरू शकतो.

शिवसेनेतही राणेंना मानणारे
काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेतही राणेंना मानणारा मोठा गट आहे. राणेंपाठोपाठ काँग्रेसमध्ये गेलेले अनेकजण मध्यंतरीच्या काळात सेनेत परतले; मात्र त्यांना हवा तसा सन्मान मिळालेला नाही. या कार्यकर्त्यांची भूमिका आता काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: devrukh konkan news Rane's BJP has entered; Then challenge before Shivsena