आमदार कदमांच्याच गावात राष्ट्रवादीला खिंडार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

"युवासेनेचे नेते योगेश कदम खेड, दापोली व मंडणगड तालुक्‍यातील कामे तडीस नेऊ शकतील, असा आम्हाला विश्‍वास वाटतो.''
- दत्ता पवार, चिंचघर

खेड ः तालुक्‍यातील चिंचघर-पवारवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार संजय कदम यांच्या गावातच शिवसेनेने राष्ट्रवादीच्या किल्ल्याला सुरुंग लावल्याने तालुक्‍यातील वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचा त्याग करणाऱ्यांनी आमदारांवर विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर आमदार कदम यांनी दापोली व मंडणगड हेच कार्यक्षेत्र ठेवले आहे. त्यांनी खेड तालुक्‍याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे खेडवासीय त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांच्या चिंचघर गावातील अनेक प्रश्‍नांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. चिंचघर गावातील पाणी प्रश्‍न बिकट बनला आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा आमदारांकडे खेटे घातले; परंतु थातूरमातूर उत्तरे देण्यापलीकडे त्यांनी या पाणीप्रश्‍नांकडे काणाडोळाच केला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे, असे राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे व्यासपीठावरूनच सांगितले. यावेळी दत्ता पवार यांच्यासह चिंचघर पवारवाडीतील शेकडो कार्यकर्ते सेनेत दाखल झाले.

येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर चिंचघर येथील या कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादीला हादरा देणारा आहे. चिंचघर गाव हे फुरूस जिल्हा परिषद गटात येत असल्याने येथील राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांना या निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्यासाठी पुरी ताकद पणाला लावावी लागणार आहे. त्यातच आमदार संजय कदम यांच्याच गावात राष्ट्रवादीला गळती लागल्यास इतरत्र काय होणार, असा प्रश्‍न यानिमित्ताने पुढे आला आहे. या कार्यक्रमप्रसंगी पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत कदम, नगरसेवक सुनील दरेकर, शैलेश कदम, किरण डफळे, सूर्यकांत कडू, सूर्यकांत कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

"युवासेनेचे नेते योगेश कदम खेड, दापोली व मंडणगड तालुक्‍यातील कामे तडीस नेऊ शकतील, असा आम्हाला विश्‍वास वाटतो.''
- दत्ता पवार, चिंचघर

Web Title: dig in ncp in khed