कोरोनाला रोखण्यासाठी आता पोलिसांची गांधीगिरी  

सचिन माळी
Tuesday, 29 September 2020

काही दिवसांपासून शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे

मंडणगड - तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पॉजिटीव्ह आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येने दिसू लागला आहे. चिंताजनक पध्दतीने कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. मात्र याचे गांभीर्य न समजणाऱ्या व विना मास्क शहरात फिरणाऱ्या नागरिकांना गांधीगिरीच्या माध्यमातून पुन्हा समज देण्याची अनोखी मोहीम मंडणगडचे पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी राबविली आहे. त्यामुळे कडक कारवाईसाठी ओळखले जाणारे पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या या कृतीतून आगामी काळात दंडात्मक कारवाईचे संकेत मिळत आहेत.

काही दिवसांपासून शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील मुख्य चौकात सकाळी विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांना व पादचाऱ्यांना मास्कचे वाटप करुन कोव्हीड नियमावाली समाजावून सांगण्यात आली. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी फिरताना मास्क व सँनिटायझर वापराचे महत्व मंडणगड पोलिसांनी नागरिकांना गांधीगिरी करत समजावून सांगीतले. 

या संदर्भात मंडणगडचे पोलिस निरिक्षक सुदाम शिंदे यांनी सांगितले की, सद्यस्थितीत नागरिकांना तीनच उपाय कोरोनापासून अधिक सुरक्षित ठेवू शकतात. तोंडाला मास्क बांधणे, सोशल डिस्टन्स आणि शारीरिक स्वच्छता. असे केल्याने निरोगी राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मंडणगड पोलीस स्थानकाच्यावतीने कोव्हीड संदर्भात राबवलेली मोहीम सलग दोन दिवस चालणार आहे. यातूनही धडा न शिकलेल्या व कोव्हीडचे नियम वांरवार तोडणाऱ्या नागरिकांवर कडक दंडात्मक कार्यवाही करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. 

हे पण वाचा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण 

मंडणगड तालुक्यात कोव्हीडचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी कोव्हीडचे नियम पाळण्याचे मास्क व सँनिटाझर याचबरोबर विनाकाम फिरण्याचे टाळावे असे आवाहन पोलिस निरिक्षक शिंदे यांनी या निमीत्ताने केली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of masks by Mangadangad police