esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

NCP-BJP-Shivsena

महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या असून चाचपणी केली जात आहे.

जिल्हा बॅंक रणधुमाळी; महाविकासची चाचपणी, 'भाजप'विरोधी थेट लढत

sakal_logo
By
संतोष कुळकर्णी

देवगड : जिल्ह्याच्या राजकीय पटलावर लक्षवेधी ठरणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने आतापासूनच व्युहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या असून चाचपणी केली जात आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आल्याने आता उमेदवारांच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

अलीकडील दोन वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. याचे राजकीय पटलाबरोबरच सहकारातही पडसाद उमटल्याचे चित्र आहे. नेत्यांच्या पक्ष बदलामुळे अनेक निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरत आहेत. त्यामुळे एकूणच वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न आहेत. खरंतर जिल्ह्याच्या राजकारणातील दंबग नेतृत्व म्हणून ओळख असलेले नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना जिल्हा बँक त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणली होती. तत्कालीन स्थितीत राणे यांचे सहकारी म्हणून सतीश सावंत यांच्याकडे बँकेची दुरा सोपवली होती; मात्र अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय चित्र पालटले.

हेही वाचा: शेतकऱ्यांची वीजतोडणी सूडबुद्धीने; नातूंची मुख्यमंत्र्यांवर टीका

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार नीतेश राणे भाजपवासी झाल्यानंतर सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करीत त्यांच्या विरोधातच शड्डू ठोकला. यातून राजकीय कलहाची ठिणगी पडली. आमदार नीतेश राणे यांच्या विजयानंतर भाजपकडून जिल्हा बँकेतील सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न झाला. त्यादृष्टीने चाचपणीही झाली; मात्र त्याला अपेक्षित यश आले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि एकूणच राजकीय वातावरण पालटले.

सद्यस्थितीत सतीश सावंत शिवसेनेचे असले तरीही महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीची त्यांना साथ लाभली आणि बँकेतील त्यांची जागा अधिकच बळकट झाली. आता तर भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी भक्कम ठेवून भाजपला हादरा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी आतापासूनच व्यूहरचनेला सुरूवात झाली आहे. यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर सध्या भर आहे.

हेही वाचा: मऊ, गोडसर रताळाच्या 'घाऱ्या' कशा बनवाव्यात? जाणून घ्या

देवगड तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या घरी जावून निवडणूक रणनितीची चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्या मनाचा कल अजमावण्याचा प्रयत्न झाला आहे. संभाव्य उमेदवाराबाबत प्राथमिक चर्चा झाली असून निवडून येण्याच्या शक्यशक्यता पडताळून पाहण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूणच निवडणूक रंजक ठरण्याची लक्षणे आहेत.

नेत्यांच्या गाठीभेटी

जिल्ह्याच्या राजकारणात लक्षवेधी ठरलेली जिल्हा बँक निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हाभर प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या असून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘अंडरकरंट’ अधिक असल्याचे जाणवते; मात्र भाजपही स्वस्थ बसणारा नसून त्यांचीही रणनिती लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

loading image
go to top