रायपाटण, राजापुरातील भूलतज्ज्ञ आणणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील भूलतज्ज्ञांच्या विषयाने रुग्णांची परवड सुरू आहे. वाटद येथील भूलतज्ज्ञ तर हजर होण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यांना किंवा पर्यायी भूलतज्ज्ञ आपल्या आदेशावरून जिल्हा रुग्णालयाला मिळवा, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. राजापूर आणि रायपाट येथील बहुतेक रुग्ण जिल्हा रुग्णालयात वर्ग केले जातात. त्यामुळे तेथील दोन्ही भूलतज्ज्ञांना जिल्हा रुग्णालयात आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न आहेत. त्यामुळे येथील गैरसोय दूर होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक बी. डी. अडसुळकर यांनी दिली. 

जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात काल सात महिला दाखल झाल्या होत्या, मात्र भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने त्यांची कुचंबणा झाली. प्रसूती कळांऐवजी त्यांचा गैरसोयीच्या कळांनी जीव अर्धमेला झाला. ही परिस्थिती अतिशय वेदनादायक होती. काही खासगी भूलतज्ज्ञांनाही बोलावण्यात आले. परंतु त्यांचे वेळापत्रक व्यस्त असल्याने ते येऊ शकले नाही. अखेर काही नातेवाईकांनी प्रसूतीसाठी आलेल्या दोन ते तीन महिलांना कोल्हापूरला हलवले. अन्य दोन खासगीमध्ये तर इतर महिलांचे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून काहींची शस्त्रक्रिया केली. ज्या पद्धतीने हा विषय रंगवला जात आहे, अशी परिस्थिती नाही. 

आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करीत आहोत. कोल्हापूरला हलविण्यात आलेल्या महिलांची परिस्थिती नाजूक होती. त्यांच्या गर्भाशयातील बाळाची पूर्ण वाढ झाली नव्हती. इतर महिलांच्या प्रसूतीला अवधी होता. तरी आम्ही स्थानिक भूलतज्ज्ञांना बोलवून काही शस्त्रक्रिया केल्याची माहिती श्री. अडसूळकर यांनी दिली.

आमदार राजन साळवी यांनी प्रयत्न करून वाटद येथील श्री. गट्टे हे भूलतज्ज्ञ दिले होते. त्यांना हजर होण्याचा ७ दिवसाचा अवधी होता. आज तो पूर्ण झाला. त्यामुळे त्यांना फोन करून विचारले तर त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते हजर होऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यांची हजर होण्याची मन:स्थिती नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना या परिस्थितीबाबत पत्र देऊन गट्टे किंवा पर्यायी भूलतज्ज्ञ देण्याची विनंती करणार आहे. 

राजापूर आणि रायपाटण ग्रामीण रुग्णालयातील दोन सर्व रुग्ण अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येतात. त्यामुळे तेथे नियुक्तीला असलेल्या भूलतज्ज्ञांना फारसे काम नाही. त्यांची प्रतिनियुक्ती किंवा बदली जिल्हा रुग्णालयात करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे भूलतज्ज्ञाचा प्रश्‍न तात्परता तरी सुटेल, असा विश्‍वास श्री. अडसुळकर यांनी व्यक्त केला. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रल्हाद देवकर उपस्थित होते. 

जिल्ह्यातील गोरगरीब जनतेसाठी लाइफलाइन म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालय आहे. परंतु रुग्णालयात प्रचंड गैरसोय आहे. याबाबत आपल्याला वारंवार कल्पना देण्यात आली आहे. रुग्णालयात आजही वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. गैरसोयीमुळे गोरगरीबांचे हाल होत असून रुग्ण दगावण्याचा धोका आहे. 

त्यामुळे आपण योग्य ती कारवाई करण्यात यावी. वर्षानुवर्षे जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती सुधारलेली नाही आणि तसा प्रयत्नही झालेला नाही. रुग्णालयात भूलतज्ज्ञ मोठी जबाबदारी निभावतात. परंतु या जागा रिक्त आहेत. त्या तत्काळ भरण्यात याव्यात, असे निवेदन राणे प्रतिष्ठानतर्फे जिल्हा शल्यचिकित्सक श्री. अडसुळकर यांना दिले.

Web Title: District Government Hospital ratnagiri