मतलई वारे वाहू लागल्याने कोकणात 'याची' चाहूल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

रत्नागिरी जिल्ह्यात गावखडी, लांजा तालुक्‍यात काही बागांमध्ये मोहोर दिसू लागला आहे. त्यामुळे हंगामाची चाहूल लागली असून आंबा बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे; परंतु अधूनमधून ढगाळ वातावरण असल्याने त्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही

रत्नागिरी - क्‍यारसह महा चक्रीवादळ सरल्यानंतर काही दिवसांतच पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली. पारा खाली घसरू लागल्यामुळे काही ठिकाणी मोहोर येण्यास सुरवात झाली आहे. ते प्रमाण दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे; मात्र कोवळी पालवी हळूहळू जून होत आहे. गेले आठवडाभर पहाटेला धुके पडू लागल्याने हवेत गारवा वाढला आहे.

मतलई वारे वाहण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. पाऊस लांबल्यामुळे उशिरापर्यंत जमिनीत ओलावा टिकून राहिला असून कलमांना पालवी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ८० टक्के कलमांना कोवळी पालवी होती. ती जून होण्यासाठी ४० ते ४५ दिवस लागतात. त्यानंतर मोहोर येण्यास सुरवात होते. त्याचवेळी थंडी आणि मतलई वारे सुरू होणे हापूस हंगामासाठी पोषक असते.

कलमांना मोहोर; बागायतदारांना दिलासा

वातावरणाचे हे गणित यंदा बिघडले. गेले आठवडाभर पारा खाली येण्यास सुरवात झाल्यामुळे थंडीचे आगमन झाले. हे वातावरण असेच राहिले तर जून झालेल्या पालवीला काही दिवसात मोहोर येईल. दहा टक्‍के कलमांना मोहोरही येऊ लागला आहे.

हंगाम लांबणार हे निश्‍चित...

रत्नागिरी जिल्ह्यात गावखडी, लांजा तालुक्‍यात काही बागांमध्ये मोहोर दिसू लागला आहे. त्यामुळे हंगामाची चाहूल लागली असून आंबा बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे; परंतु अधूनमधून ढगाळ वातावरण असल्याने त्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामध्ये कोवळी पालवीचे प्रमाण अधिक असल्याने हंगाम लांबणार हे निश्‍चित झाले आहे.

हवामानाचा अंदाज घेऊन फवारणी करावी

वातावरणातील अस्थिरता आणि थंडी प्रमाणापेक्षा अधिक राहिली तर त्याचे परिणाम मोहोरावर होताे. अनेक वेळा पुनर्मोहरांचे संकट उभे राहते. त्याला सामोरे जाण्यासाठी मोहोर वाचविण्याचे आव्हान बागायतदारांपुढे असते. त्यामुळे वेळोवेळी हवामानाचा अंदाज घेऊन कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. वातावरणाचा अंदाज घेऊन कृषी विभाग आणि आत्मामार्फत आंबा बागायतदारांसाठी कीटकनाशक फवारणीचे मार्गदर्शन शिबिर ठिकठिकाणी घेण्यास सुरवात केली आहे. हवामानाचा अंदाज घेऊन कीटकनाशकांची फवारणी करतानाच खर्चाचे नियोजन कसे करता येईल याबाबत माहिती दिली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The District In Mango Season