सह्याद्री मार्गामधून दोडामार्ग ‘बायपास’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

सावंतवाडी - सह्याद्रीतील दुर्लक्षित गावांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या १११ किलोमीटरच्या सह्याद्री राज्य मार्गामधून अख्खा दोडामार्ग तालुका बायपास झाला आहे. या भागाला खऱ्या अर्थाने सह्याद्री मार्गाची गरज आहे. यामुळे येथे निसर्ग पर्यटन रुजू शकेल. दोडामार्ग तालुक्‍यातून हा मार्ग वळवावा यासाठीची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सावंतवाडी - सह्याद्रीतील दुर्लक्षित गावांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या १११ किलोमीटरच्या सह्याद्री राज्य मार्गामधून अख्खा दोडामार्ग तालुका बायपास झाला आहे. या भागाला खऱ्या अर्थाने सह्याद्री मार्गाची गरज आहे. यामुळे येथे निसर्ग पर्यटन रुजू शकेल. दोडामार्ग तालुक्‍यातून हा मार्ग वळवावा यासाठीची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सह्याद्री पट्ट्यातील गावांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या सह्याद्री राज्यमार्गासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. १११ किलोमीटर लांबी असलेला हा रस्ता कनेडी-शिवापूरमार्गे बांदा येथे महामार्गाला जोडला जाणार आहे. जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी आणि दोडामार्ग या पाच तालुक्‍यांमध्ये सह्याद्रीचा पट्टा येतो; मात्र हा मार्ग कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या तीन तालुक्‍यांतील केवळ १५ ते १६ गावे कव्हर करत आहे. लवकरात लवकर हे काम सुरू करण्यात येणार आहे.

सह्याद्री मार्गाची संकल्पना साधारण दहा ते पंधरा वर्षांपासून मांडली जात आहे. गेल्या चार वर्षांत याला मूर्त रूप आले. रस्ते मुख्य प्रवाहाशी जोडलेले नसल्याने सह्याद्रीच्या दुर्गम भागातील अनेक गावे क्षमता असूनही दुर्लक्षित राहिली. या गावांमधून राज्यमार्ग गेल्यास त्याचा विकास होईल, हा यामागचा मुख्य हेतू होता; मात्र या रस्त्याच्या प्रकल्पात केवळ तीनच तालुके कव्हर करण्यात आले आहेत. सह्याद्री पट्ट्यातील गावांच्या विकासासाठी दुुवा ठरणाऱ्या सह्याद्री राज्यमार्गासाठी साडेतीन कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या निधीच्या माध्यमातून प्रस्तावित रस्त्याचे डांबरीकरण, खडीकरण आदी कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. सद्यःस्थिती लक्षात घेता या रस्त्याची रुंदी वाढविण्याबाबत कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया आणि अन्य गोष्टींबाबत तूर्तास तरी कोणताही निर्णय झालेला नाही. त्या स्थितीत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. हा रस्ता झाल्यानंतर कनेडी कुपवडे, कडावल, नेरूर, वाडोस, शिवापूर, शिरशिंगे, कलंबिस्त, वेर्ले, सांगेली, धवडकी, दाणोली, ओटवणे, विलवडे आदी डोंगराळ भागातील गावे जोडली जाणार आहेत; मात्र या प्रकल्पातून शक्‍य असूनही दोडामार्ग तालुका वगळण्यात आला आहे.

हा मार्ग कनेडी-शिवापूर मार्गे विलवडे येथे येतो. तेथून तो असनिये, झोळंबे, तळकट, कुंब्रल, कुडासे, मणेरी मार्गे दोडामार्गला बाहेर काढणे आवश्‍यक होते. तसे झाले असते तर दोडामार्ग तालुक्‍यातील शेती बागायतीने समृद्ध पण दळणवळणाच्या सुविधांमुळे दुर्लक्षित राहिलेली गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार होती. या परिसरात निसर्ग आणि कृषी पर्यटनाला आवश्‍यक सर्व क्षमता आहेत. हा राज्यमार्ग या भागातून गेल्यास त्याला चालना मिळू शकते; मात्र नियोजित सह्याद्री मार्ग विलवडेहून वाफोलीमार्गे बांद्याकडे वळविण्यात आला. बांदा येथे मुंबई-गोवा हा चारपदरी महामार्ग आहे. त्यामुळे राज्य मार्गाचे फारसे फायदे या भागाला मिळणार नाहीत. उलट विलवडेतून असनिये- झोळंबेमार्गे दोडामार्गकडे हा मार्ग नेला असता तर तेथील अरुंद आणि दुर्लक्षित रस्ते राज्यमार्गाच्या दर्जामुळे सुधारले असते. गोव्यात येणारे पर्यटक या तालुक्‍याकडे वळले असते; मात्र तसे झालेले नाही.

हा मार्ग दोडामार्ग तालुक्‍यातून न्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पंचायत समिती सदस्य धनश्री गवस यांनी नुकतेच याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. या मागणीसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज सौ. देसाई यांनी व्यक्त केली.

दृष्टिक्षेपात
 नियोजित सह्याद्री राज्यमार्ग - कनेडी- शिवापूर- शिरशिंगे- ओटवणे-विलवडे-बांदा
 दोडामार्गवासीयांना अपेक्षित सह्याद्री मार्ग - कनेडी- शिवापूर- विलवडे- असनिये- झोळंबे- मणेरी- दोडामार्ग
 सध्याची सह्याद्री मार्गाची लांबी - १११ किलोमीटर
 दोडामार्गवासीयांनी अपेक्षित मार्गाची संभाव्य लांबी - १५० किलोमीटर

नियोजित सह्याद्री राज्यमार्ग बांद्यातून गोव्याकडे जातो. बांद्यात राष्ट्रीय महामार्ग असल्याने हा मार्ग विलवडे, असनिये, झोळंबेमार्गे दोडामार्गला न्यावा व तेथून गोव्याला जोडावा. तसे झाल्यास दोडामार्ग तालुक्‍यातील दुर्लक्षित गावे मुख्य प्रवाहाला जोडली जातील.
- धनश्री गवस, पंचायत समिती सदस्य, दोडामार्ग.

Web Title: Dodamarg bypass