
निवडणूक निकाल आणि नगराध्यक्ष निवडीनंतर एका गटाने दुसऱ्या गटावर कारवाईचा आग्रह धरला
भाजपमध्ये अस्वस्थता कायम; अल्टिमेटम दिलेले 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत
दोडामार्ग : तालुका भाजपच्या गोटात सध्या वरवर शांतता असली तरी अद्यापही दोन्ही गटांचे मनोमिलन झालेले नाही. भाजपच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाने एका गटाला पक्ष शिस्त न पाळल्याबद्दल आणि निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या आहेत, तर त्या गटावर कारवाई न झाल्यास नवा पर्याय शोधण्याचा इशारा देवून आठवडाभराचा अल्टिमेटम देणाऱ्या दुसऱ्या गटाने तूर्त ‘वेट अँड वॉच’ची भूमिका स्वीकारली आहे. कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीदरम्यान दोन्ही गटातील दुफळी प्रकर्षाने समोर आली होती.
दोन गटातील हाणामारी, परस्परविरोधी तक्रारी, एका गटातील काहीजणांवर दाखल झालेले अजामीनपात्र गुन्हे, त्यामुळे त्यांचे भूमिगत होणे, त्यानंतर झालेली नगराध्यक्ष निवड आणि त्यात त्या गटाची झालेली सरशी या सगळ्या घटना तालुकावासीयांनी पाहिल्या आहेत. नगरपंचायतीत सत्ता स्थापन झाल्यावर जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी बरखास्त केलेली तालुका कार्यकारिणी आणि अद्याप भाजपला न मिळालेले तालुका नेतृत्व अशा अनेक घटनांनी भाजप सतत चर्चेत राहिली.
हेही वाचा: 'असनी' चक्रीवादळाचा बंगालच्या उपसागराला बसणार फटका?
नगरपंचायतीतील विजयानंतर तर राणेसमर्थक आणि जुनी भाजप असे सरळसरळ दोन गट तालुकावासीयांनी पाहिले. सध्या सत्ता जुन्या भाजपच्या गटाकडे आहे; मात्र राणेसमर्थक गटाने नगरपंचायतीत जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा सभागृहात लावून आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
निवडणूक निकाल आणि नगराध्यक्ष निवडीनंतर एका गटाने दुसऱ्या गटावर कारवाईचा आग्रह धरला आणि पक्ष सोडण्याचा इशाराही दिला. त्याच दरम्यान किंवा काही दिवस आधी जिल्हा नेतृत्वाने दुसऱ्या गटातील साधारणतः सहा सात जणांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या. त्यामुळे पक्ष सोडण्यासाठी अल्टिमेटम देणारा गट सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. तर ज्यांना नोटीसा मिळाल्यात त्यांनी मात्र आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मधल्या काळात दोन्ही गटांनी पक्षांतर करण्याची मानसिकता तयार केली होती. त्यातील एक गट वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे तर दुसरा गट पक्षांतर करायचे की पक्षातच राहून राजकीय चाली खेळायच्या यावर विचारविनिमय करत आहे.
हेही वाचा: 'द गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'ला इतकं महत्त्व का? कशी झाली याची सुरूवात?
खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत त्या गटातील काहीजण शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा होती. खासदार आले आणि गेलेही; पण त्यांचा प्रवेश झाला नाही. शिवसेनेने त्यांना होल्डवर ठेवले की त्यांनी शिवसेनेला होल्डवर ठेवले हे आजच्या घडीला सांगणे अवघड असले तरी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील कार्यकर्ते फुटून दुसऱ्या पक्षात जाणे भाजपला परवडणारे नाही. त्यामुळे दोन्ही गटांना पक्षातच ठेवून दोन्ही गटांमध्ये ‘मांडवली’ घडवून आणणाऱ्या तालुकाध्यक्षांच्या शोधात जिल्हा नेतृत्व आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनीही एकीकडे सावध भूमिका घेतल्याचे सध्या तरी चित्र आहे.
शिवसेनेलाही कॅप्टन हवाय
भाजपाप्रमाणे शिवसेनाही सध्या नेतृत्वहीन आहे. त्यांनीही अद्याप तालुकाप्रमुख नेमलेला नाही. तालुकाप्रमुख म्हणून उपजिल्हाप्रमुख असलेल्या गणेशप्रसाद गवस यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्या नावाची घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे. असे असताना शिवसेनेकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यास होणारी दिरंगाई अनेकांना अस्वस्थ करते आहे. सध्या शिवसेना आणि भाजपची बोट कॅप्टनविना हेलकावे खात आहे. तिला सावरण्यासाठी सक्षम आणि कणखर कॅप्टनची नियुक्ती आवश्यक आहे.
हेही वाचा: काश्मीर फाईल्स पाहून काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणतात, 'सगळं काही अर्धवट, नुसतीच हिंसा!'
Web Title: Dodamarg Sindhudurg Bjp Internal Dispute Nagar Panchayat Election Ultimatum Second Group
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..