गुढ उकलले : अभ्यासकांचा अंदाज ; डॉल्फिनमध्ये रोगप्रतिकारक शक्‍ती कमी... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

मृत्यूचे कारण; अभ्यासकांचा अंदाज; जागतिक स्तरावर अभ्यास सुरू, कोकणात अभ्यासाची गरज 

रत्नागिरी : दापोलीमध्ये पाळंदे, सालदुरे येथील किनारी भागात मृत डॉल्फिन आढळून आले होते. ते कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे डॉल्फिनच्या मृत्यूचे कारण पुढे येऊ शकले नाही. यामागे डॉल्फिनमधील रोगप्रतिकारकशक्‍ती कमी झाल्यामुळे अचानक मृत होण्याचे कारण असू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्‍त केला आहे. डॉल्फिनच्या मृत्यूसंदर्भात जागतिक स्तरावर अभ्यास सुरू असून, कोकणात होणाऱ्या या माशांच्या मृत्यूचा अभ्यास होणे गरजेचे आहे. 

कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाले असतानाच कोकण किनारपट्टीवरील सालदुरे आणि पाळंदे या दोन ठिकाणी मृत डॉल्फिन आढळून आले. सलग आठ दिवसांत या घटना घडल्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत विविध अंदाज वर्तविले जात आहेत. डॉल्फिनच्या मृत्यूचे कारण अद्याप निश्‍चित झालेले नाही. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे बहुतांश मच्छीमारी बंद आहे. किनारी पर्यटनही थांबलेले आहे. मृत डॉल्फिन आढळला, तेव्हा कुजलेल्या अवस्थेत होता. परिणामी त्याला तिथेच खड्डा खणून पुरण्यात आले. या परिस्थितीत माशांचे होणारे मृत्यू हा अभ्यासाचा विषय आहे. दापोली, गुहागरसह रत्नागिरी किनारी झुंडीने डॉल्फिन आढळत आहेत. त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. सध्या टाळेबंदीमुळे पर्यटकांची गर्दी कमी आहे. या परिस्थितीत दापोलीत झालेले मृत्यू हे चिंताजनक असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्‍त केले आहे. जगभरात यावर अभ्यास सुरू आहे. 

हेही वाचा- ऑनड्युटी टिकटॉक व्हिडिओ बनवणे आले अंगलट...तासगाव आगाराच्या महिला निरीक्षकांना केले निलंबित -
समुद्रातील अन्नसाखळीत डॉल्फिन आणि व्हेल हे दोन मासे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे डॉल्फिन माशांचे सातत्याने मृत्यू होऊ लागले तर त्याचे कारण शोधणे आवश्‍यक आहे. विषाणूने बाधित होऊन हे मासे मरत असतील तर त्याला आळा घालण्याची जबाबदारी वाढणार आहे. सध्या मत्स्यदुष्काळाचे सावट असून, डॉल्फिनसारख्या माशांची साखळी तुटणार असेल तर भविष्यासाठी घातक ठरू शकते. दापोली येथे सापडलेल्या दोन्ही मृत डॉल्फिन हे कुजलेल्या अवस्थेत होते. त्यांच्या पोटातील टिश्‍यू घेणे अशक्‍य होते. त्यांच्या मृत्यूचे कारण शोधणे अवघड झाले आहे, असे मोहिते यांनी सांगितले. 
 
मृत्यूचे नवीन कारण 
माशांच्या मृत्यूला चार कारणे वर्तविली जातात. बोटीच्या पंख्यात अडकून, नैसर्गिक मृत, मासेमारी जाळ्यात अडकून आणि समुद्रात नौकांवर सुरू असलेल्या प्रयोगादरम्यान सोनार वेव्हचा वापर केल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या किरणांचा परिणाम माशांवर होतो. त्यात मासे गुदमरून मृत पावतात. याव्यतिरिक्‍त माशांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास ते मृत होऊ शकतात, असे नवीन कारण पुढे येत आहे. 

हेही वाचा- शिखरजी यात्रेहून आलेल्या भाविकांनी  घातला महाप्रसाद आणि गावात झाला भलताच गोंधळ.....

डॉल्फिनच्या टिश्‍यूमध्ये मर्क्‍युरीचे प्रमाण वाढले तर.. 
मृत डॉल्फिनच्या पोटातील टिश्‍यूचे नमुने घेऊन त्यावर अभ्यास होण्याची गरज आहे. डॉल्फिनच्या टिश्‍यूमध्ये हेवी मेटल म्हणजेच मर्क्‍युरीचे प्रमाण वाढले तर त्याची रोगप्रतिकारकशक्‍ती कमी होते. मॉर्बिली किंवा तापीलोमासारख्या विषाणूची बाधा झालेल्या माशांमध्ये मर्क्‍युरी वाढते. ते माशांना घातक ठरते. रोगप्रतिकारकशक्‍ती कमी झाल्यामुळे ते क्षीण होऊन किनाऱ्याकडे येतात. त्यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज अभ्यासक डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी वर्तविला आहे. त्यादृष्टीने सर्वच स्तरावर सविस्तर संशोधन होण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dolphins death answer Dolphins have low immunity