स्वस्तातला कांदा थेट घरोघरी विक्रीला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

राज्यातील सर्वच बाजारपेठांत कांद्याचे दर घसरल्याने उत्पादकांनी थेट घरोघरी जाऊन कांदा विक्री सुरू केली आहे. सहा रुपये किलो या दराने पन्नासच किलोचे पोते तीनशे रुपयांना विकले जात आहे. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने विक्रेते हैराण झाले आहेत.

कणकवली - राज्यातील सर्वच बाजारपेठांत कांद्याचे दर घसरल्याने उत्पादकांनी थेट घरोघरी जाऊन कांदा विक्री सुरू केली आहे. सहा रुपये किलो या दराने पन्नासच किलोचे पोते तीनशे रुपयांना विकले जात आहे. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने विक्रेते हैराण झाले आहेत.

जिल्ह्यात पावसाळ्यातील बेगमी म्हणून मे अखेरपर्यंत कांद्याची पोती खरेदी केली जातात. मात्र जिल्ह्यातील बाजारपेठांत काद्यांची उलाढाल अद्याप वाढलेली नाही. दुसरीकडे राज्यातील बाजारपेठांत कांद्याचे दर खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शहर आणि ग्रामीण भागात जावून कांदा विकण्यास सुरवात केली आहे. दरवर्षी पाचशे ते साडेसातशे रुपयापर्यंत पन्नास किलोच्या कांदा पोत्याचा दर राहतो. यंदा आठवडा बाजारामध्ये पाचशे रुपयापर्यंत कांदा विक्रीला ठेवला आहे, मात्र ग्राहकांकडून कांदा खरेदीला अद्याप म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. कांद्यातील तूट भरून काढण्यासाठी उत्पादक तसेच विक्रेत्यांनी ट्रक, टेम्पोच्या माध्यमातून गावागावांत जाऊन घरोघरी कांदा विक्री सुरू केली आहे.

सध्या बाजारपेठांत दहा ते पंधरा रुपये प्रतिकिलोपर्यंत कांदा विक्रीचा दर आहे, मात्र गावागावांत जाऊन विक्री करणारे विक्रेते सहा रुपये प्रतिकिलो या दराने कांदा देत आहेत. स्वस्त दरात कांदा मिळत असल्याने सुरवातीला ग्राहकांनी कांदा खरेदी केला. मात्र बराचसा कांदा खराब होऊ लागल्याने, ग्राहकांनी या कांद्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. गेली काही वर्षे कांद्याला अपेक्षित दर मिळालेला नाही. कांदा उत्पादनाबरोबरच कांद्याची वाहतूक आणि विक्री यामधील खर्चही भरून निघत नसल्याची प्रतिक्रिया कांदा विक्रेत्यांनी दिली.

Web Title: door to door onion sale in Kankawli