प्रमोद जठारांचा पगार किती, बोलतात किती ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या निवासस्थानी श्री. परुळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्याच्या सोबत अण्णा केसरकर उपस्थित होते.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - अख्ख्या नारायण राणे यांना अंगावर झेलून प्रमोद जठार ज्या पक्षाचे आमदार झाले त्याच पक्षाने त्यांना पुन्हा विधानसभेचे तिकीट का नाकारले असा सवाल करत त्यांची अवस्था म्हणजे पगार किती आणि बोलतात किती अशी झाली असल्याची टीका शिवसेना प्रवक्ते डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी केली.

येथील माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या निवासस्थानी श्री. परुळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्याच्या सोबत अण्णा केसरकर उपस्थित होते. श्री.परुळेकर म्हणाले, ""भाजपकडून कितीही वल्गना केल्या तरी या निवडणुकीत शिवसेनेचे बाबू कुडतरकर विजय होणार आहेत. त्यामुळे संजू परब यांना उमेदवारी देऊन राणे कुटुंबीयांनी प्रचारातून पळ काढला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा जिल्हाध्यक्ष जठार बोलत आहेत ते शहरात विरोधाचा विषय ठरत आहेत. बाहेरून आलेले लोक इथे वल्गना करू शकतात; मात्र येथील जनता सुज्ञ, सुजाण असल्याने त्यांच्या भूलथापांना फसणार नाही. ज्या गांधी चौकात जाहीर सभा झाल्या ते गांधी चौक 26 व 27 ला आधीच बुक करून ठेवले मात्र या ठिकाणी कुठलीही सभा झाली नाही. या मागचे कारण काय असावे त्यांनाच माहीत.'' 

हेही वाचा - पाठींबा हवा असेल तर शिवसेनेने ठेवला हा प्रस्ताव... 

सावंतवाडी शहरात धनशक्तीचे मुक्त वाटप

ते म्हणाले, ""आज सावंतवाडी शहरात धनशक्तीचे मुक्त वाटप सुरू आहे. लोकशाहीला धाब्यावर बसवून असे प्रकार सुरू आहेत; मात्र येथील सुज्ञ मतदारांनी अशा प्रकाराला चपराक दिली असून शहरातील बिरोडकर टेंब येथे या धनशक्तीचे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खडसावले. त्यांनी तेथून पळ काढला; मात्र या शहरात जनशक्तीचा किती वापर केला तरी जनतेने आपल्या मत कोणाला द्यायचं हे आधीच ठरवले आहे.''

हेही वाचा - कर्जमाफीत येणे बाकीचा समावेश केल्यास यांना होईल लाभ 

कुडतरकर यांनी माझी कुंडली जरूर काढावी

ते म्हणाले, ""भाजपचे नेते संदीप कुडतरकर यांनी माझी कुंडली काढण्याची भाषा केली होती; मात्र त्यांनी माझी कुंडली जरूर काढावी या कुंडलीत खून, खंडणी, जमीन बळकावणे आदी गोष्टी मिळणार नाहीत. या जिल्ह्यातील गरीब रुग्णांना आर्थिक मदत केलेल्याची कुंडली, सामाजिक काम, औष्णिक ऊर्जा प्रकल्प लढा आधी नक्कीच दिसेल.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Jayendra Parulekar Comment On Pramod Jathar Sindudurg Marathi News