डॉ. महेश केळुस्कर यांचा कोमसाप अध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

खेड - कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून प्रा. अशोक ठाकूर यांची एकमताने निवड झाली. मालगुंड येथे झालेल्या केंद्रीय समितीच्या सभेत ही निवड झाली. डॉ. महेश केळुस्कर यांचा राजीनामा या सभेत मंजूर केला.

खेड - कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून प्रा. अशोक ठाकूर यांची एकमताने निवड झाली. मालगुंड येथे झालेल्या केंद्रीय समितीच्या सभेत ही निवड झाली. डॉ. महेश केळुस्कर यांचा राजीनामा या सभेत मंजूर केला.

‘कोमसाप’चे संस्थापक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक, कार्याध्यक्ष नमिता कीर, भास्करराव शेट्ये, अरुण नेरूरकर, रमेश कीर, गजानन पाटील, कार्यवाह माधव अंकलगे, शशिकांत तिरोडकर यांच्यासह केंद्रीय समितीचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

मावळते अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. त्यांचा राजीनामा सभेत मंजूर करण्यात आला. नियमाप्रमाणे नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होईपर्यंत प्रा. ठाकूर हे अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. प्रा. ठाकूर हे गेली २८ वर्षे  कोमसापचे सक्रिय सभासद आहेत व साहित्यिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गाव केळवे (ता. पालघर, ठाणे) आहे. 

मी सर्व साहित्यिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे. कोमसापचा विस्तार मोठा असल्याने शक्‍यतो सर्वच शाखांना भेटी देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. गेले काही महिने कोमसापची कामे थांबली होती, ती कामे आता तातडीने मार्गी लावण्यात येतील. प्रत्येक शाखांचा जमा-खर्च घेणे याला प्राधान्य देण्यात येईल. या क्षेत्रात अनेक अडचणी येत असतात. अशा वेळी अडचणींवर मात करून पुढे गेले पाहिजे. तसेच जे साहित्यिक दुखावले असतील, त्यांना बरोबर घेऊन मी पुढे जाणार आहे, असे ठाकूर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले.

केंद्रीय मध्यवर्ती साहित्य संमेलन रत्नागिरीत
यावर्षी केंद्रीय मध्यवर्ती साहित्य संमेलन हे रत्नागिरीत घेण्याचे सभेत ठरवले. २०१२ मध्ये दापोली येथे असे संमेलन घेण्यात आले होते. हे संमेलन डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होणार असून, लवकरच त्याच्या तारखा ठरवण्यात येतील, असे कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Mahesh Keluskar resign