धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांकडून स्मशानभूमी, कब्रस्तानांची स्वच्छता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

एक नजर

  • डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने शहर व परिसरात स्वच्छता मोहीम. 
  • शेकडो श्री सदस्यांचा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग 
  • स्मशानभूमी व कब्रस्तानात स्वच्छता 

चिपळूण - गेल्या काही वर्षापासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या श्री सदस्यांनी स्मशानभूमी आणि कब्रस्ताने चकाचक करून वेगळा आदर्श निर्माण केला. शहर आणि परिसरात शेकडो श्री सदस्यांनी रविवारच्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेत स्मशानभूमी व कब्रस्तानातील अस्वच्छता दूर केली आहे. 

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी (ता.28) शहर व परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यापूर्वीही गेल्या काही वर्षापासून श्री सदस्यांकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम सातत्याने राबवली जात आहे. विविध सामाजिक विधायक उपक्रम राबवून श्री सदस्यांनी वेगळा आदर्श निर्माण करीत सामाजिक बांधिलकीही जपली आहे.

गतवर्षी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी शहरातील सार्वजनिक स्थळांची निवड करून स्वच्छता केली. शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्यातही सदस्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. शहरासह ग्रामीण भागातील स्मशानभूमी व कब्रस्ताने स्वच्छतेत दुर्लक्षित राहिली आहेत. येथेही स्वच्छता राहण्यासाठी श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.

शहरातील रामतीर्थ, गणेशतीर्थ उक्ताड, मापारी मोहल्ला उक्ताड, देसाई मोहल्ला कब्रस्तान, पेठमाप स्मशानभूमी, गोवळकोट स्मशानभूमी, मिरजोळी स्मशानभूमी व कब्रस्तान, कापसाळ, कामथे, टेरव, धामणवणे, अलोरे, शिरगाव, कुंभार्ली, पोफळी, नागावे, सती चिंचघरी, खेर्डी, बहादूरशेख कळंबस्ते, पेढे आदी गावांच्या स्मशानभूमी व कब्रस्तांनाची स्वच्छता करण्यात आली. 

कचऱ्याची योग्य विल्हेवाट 
सकाळीच साडेसातच्या सुमारास श्री सदस्य हातात कोयता, विळे, घमेली, विळे, झाडू घेऊन नियुक्ती केलेल्या रवाना झाले. त्यानंतर जोमाने सार्वजनिक स्वच्छतेस सुरवात झाली. शहरात संकलित झालेला कचरा पालिकेच्या वाहनातून नेण्यात आला. ग्रामीण भागात कचरा व प्लास्टिक संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Nanasaheb Dharmadhikari Pratishthan Cleanliness campaign