'आरोग्यमंत्र्यांच्या बाटलीमध्ये मुख्यमंत्र्यांची औषधं'

मुझफ्फर खान
Monday, 28 September 2020

भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी माझे कुटूंब माझे अभियान या अभियानाची खिल्ली उडवली

चिपळूण : कोरोना काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करायचे. त्याचे श्रेय राष्ट्रवादीला मिळत होते म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी हे अभियान सुरू केले. कोरोनाची साथ पसरल्यानंतर जे काम आरोग्य विभागातील यंत्रणेकडून सुरू होते तेच काम माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहीमेतून होत आहे. म्हणजे आरोग्यमंत्र्यांच्या बाटलीमध्ये मुख्यमंत्र्यांची औषध वाटली जात आहे. अशा शब्दांत भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी माझे कुटूंब माझे अभियान या अभियानाची खिल्ली उडवली. 

हेही वाचा - मंडणगडात निसर्गग्रस्तांना नुकसानीपोटी ४० कोटी 

केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकर्‍यांच्या दृष्टीने हिताचे आहे. या विधेयकामुळे कृषी क्षेत्रात आणि शेतकर्‍यांमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत, असा दावाही त्यांनी केला. या विधेयकाला विरोध करणार्‍या युवा संघटनेत किती शेतकरी आहेत, असा टोला अप्रत्यक्षरित्या त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसला हाणला. डॉ. नातू म्हणाले, केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकाला राज्यातील एका युवक संघटनेकडून विरोध होत आहे. तो पूर्णपणे चुकीचा आणि शेतकर्‍यांची दिशाभूल करणारा आहे. या विधेयकामुळे शेतकरी खर्‍या अर्थाने आत्मनिर्भर होणार आहे. शेतकर्‍यांना आपला शेतमाल विकता येणार आहे. बाजार समित्यांचे अधिकार कमी होतील पण अस्तित्व नष्ट होणार नाही. शेती क्षेत्रावर अवलंबून असलेल्या माथाडी कामगारांची गरज कालही होती उद्याही असणार आहे. हा कायदा कोकणच्या हिताचा आहे. 

केंद्रात कोकणचे प्रतिनिधीत्व करणार्‍यांनी तो व्यवस्थितपणे मांडायला हवा होता, पण कालपर्यंत सत्तेत बसलेले आता विरोधात आहेत. त्यामुळे ते कदाचित या कायद्याचा अभ्यास करत असतील, असा टोला त्यांनी खासदार विनायक राऊत यांना लगावला. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. सरकारकडून योग्य नियोजन झाले नाही, त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. आरोग्य यंत्रणा हतबल झाली. पण जिल्ह्याकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांकडे वेळच नाही. त्यामुळे पालकमंत्री जिल्ह्याचा कारभार पाहत आहेत. त्यांना कुणी आणि कोणते अधिकार दिले हे तरी स्पष्ट होऊदे, असा टोला त्यांनी उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांना लगावला. 

हेही वाचा - सीआरझेड ई-सुनावणीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उडाला फज्जा 

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक घरात दोन मास्क आणि सॉनिटायरझरचे वाटप केले जाणार आहे. अशी घोषणा उदय सामंत यांनी केली. त्यावर डॉ. नातू म्हणाले, हा तर ठेकेदाराच्या भल्यासाठी घेतलेला निर्णय आहे. कामथे उपजिल्हा रूग्णालयाला जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला खरा पण त्यांना तो अधिकार आहे का ? जिल्ह्यात चार वरिष्ठ अधिकारी डॉक्टर आहेत. या अधिकार्‍यांचे टास्क फोर्स तयार करून कोरोनाबाबत तातडीचे निर्णय होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. नातू यांनी व्यक्त केले. 

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कामगार विधेयक कायद्याचे डॉ. नातू यांनी समर्थन केले. ते म्हणाले, काळानूसार डिजिटीलायझेशन आणि यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उद्योगासाठी लागणारी कामगारांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे हे विधेयक काळानूसार बदलण्यात आले आहे. 

 

संपादन -स्नेहल कदम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. vinay natu criticised on the policy of maze kutumb mazi jababdari in ratnagiri