esakal | अमेरिकेतील बाप्पाची प्रतिष्ठापना रत्नागिरीतून; भाविकांनी केली हायटेक पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

due to corona online ganesh puja from ratnagiri to america in ratnagiri

संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष येऊन पूजाअर्चा करीत प्राणप्रतिष्ठापना करण्यापेक्षा ऑनलाइन गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली

अमेरिकेतील बाप्पाची प्रतिष्ठापना रत्नागिरीतून; भाविकांनी केली हायटेक पूजा

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोना महामारीचे आज गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेवरही काहीसे सावट होते; मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने त्यावर मात केली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणेश प्रतिष्ठापनेचा मुहूर्त साधत, अनेक भटजींनी ऑनलाईन पूजा करून प्राणप्रतिष्ठापना केली. रत्नागिरी, मुंबई, पुण्यातील गणेशांचा यात समावेश आहे. एवढेच नाही तर रत्नागिरीतील अभय मुळ्ये गुरुजींनी अमेरिकेतील डलास येथील शनिवारी रात्री ९ वाजता गणेशाची ऑनलाईन प्राणप्रतिष्ठापना केली आहे. 

हेही वाचा - Good News : आता मस्त्य व्यावसायिकांनाही मिळणार कर्ज ; ही आहे योजना...

कोरोनाच्या महामारीचे संकट कमी झालेले नाही. गेली पाच महिने नागरिक या संकटाचा सामना करीत आहेत. त्याचा सर्व क्षेत्रांवर विपरित परिणाम झाला असून सण, उत्सवदेखील त्यातून सुटलेले नाहीत. कोकणासह राज्यात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने व दिमाखात साजरा केला जातो. संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी हा उत्सव रद्द केला किंवा त्याचे विस्तारित स्वरूप कमी केले. यावर्षी अनेक ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना ऑनलाईन केली. गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी वेळेत भटजी मिळणे गरजेचे असते. कोरोनाचे सावट असल्याने संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष येऊन पूजाअर्चा करीत प्राणप्रतिष्ठापना करण्यापेक्षा ऑनलाइन गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली.

रत्नागिरीतील अभय मुळये गुरुजी यांनी रत्नागिरी, मुंबई, पुणे येथे गुगल मीट ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पूजा केली. व्हॉट्‌स ॲप कॉलच्या माध्यमातूनही अनेकांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. काही भटजींनी तर पीपीई कीट घालून पूजा केली तर काहींनी प्रत्यक्ष जाऊन मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करून पूजा केली. संसर्ग टाळण्यासाठी आधुनिक तंत्राचा चांगला वापर धार्मिक कार्यात केल्याचे स्पष्ट  होते. एवढेच नाही, तर  मुळ्ये यांनी काल २२ तारखेला रात्री आठ वाजता अमेरिकेतील डलास येथे गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे.

हेही वाचा - तडफडणाऱ्या म्हशीसाठी ते धावले अन् घडला अनर्थ.... सिंधुदुर्गात कुठे घडली घटना...

"कोकणामध्ये गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. परदेशात असलेल्यांना काही कारणास्तव गावी यासाठी येता येत नाही. गुगल मीटच्या माध्यमातून अनेकांना यामध्ये घेता येते. मात्र, पूजेचे पावित्र्य आणि व्यक्तीगत लक्ष देत पूजा करता यावी, यासाठी एकावेळी चौघांना ऑनलाईन घेऊन प्रतिष्ठापना करतो. त्यासाठी मी घरी ऑप्टिकल फायबरपासून इन्व्हटरची व्यवस्था केली आहे. विद्युतपुरवठा खंडित झाला, तरी पूजेमध्ये 
व्यत्यय येत नाही."

-अभय मुळ्ये, गुरुजी, रत्नागिरी

संपादन - स्नेहल कदम

loading image