गणपती मंदिर बंदच, आता उंदीरही झाला बंदिस्त

राजेश कळंबटे
Sunday, 27 September 2020

मंदिराच्या दरवाज्याबाहेर उभे राहून दुधाची तहान ताकावर भागवल्याप्रमाणे हात जोडून निघून जात आहेत.

रत्नागिरी : गणपतीपुळेतील श्रींच्या दर्शनाला शेकडो भाविक येत आहेत. श्रींचे मुखदर्शन होत नसल्याने कुणी कळसाचे तर कुणी मंदिराबाहेरील उंदराच्या दर्शनावर समाधान मानतात. इथेही कोरोनाने पाठ सोडलेली नाहीच. उंदराच्या कानात सांगण्यासाठी तोंड जवळ नेत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. या भितीने मंदिर प्रशासनाने उंदिराभोवती लोखंडी कड केले आहे. आता मंदिराच्या दरवाज्याबाहेर उभे राहून दुधाची तहान ताकावर भागवल्याप्रमाणे हात जोडून निघून जात आहेत.

हेही वाचा - कोकणात काळ्या तिळाचे होणार संशोधन 

जिल्हा बंदी उठल्यानंतर दर्शनासाठी आतुर झालेले भक्तगण मंदिराच्या परिसरात येऊन दुधाची तहान ताकावर भागविल्याप्रमाणे बाहेरून दर्शन घेऊन समाधान मानत आहेत. अशी परिस्थिती रत्नागिरी तालुक्यातील प्रसिध्द गणपतीपुळे पर्यटनस्थळी दिसत आहे. दररोज शंभरहून अधिक भक्तगण दर्शनाच्या आशेने गणपतीपुळेत येतात. कुणी कळस दर्शनावर तर कुणी मंदिराबाहेरील उंदीराच्या कानात इच्छा सांगून श्रींच्या दर्शनाची आस भागवत आहेत. उंदराच्या कानात सांगितलेली इच्छा ही थेट श्रींपर्यंत पोचते अशी भक्तांची श्रध्दा आहे. 

उंदीर हे गणपतीचे वाहन आहे. गणेश मंदिराजवळ उंदराची मुर्ती असतेच. त्याप्रमाणेच गणपतीपुळेमध्ये मंदिराबाहेर अशीच मुर्ती ठेवण्यात आली आहे. अनेक भक्तगण उंदराच्या एका कानात इच्छा व्यक्त करताना, दुसर्‍या कानावर हात ठेवतात. श्रींपर्यंत इच्छा, नवस बोलण्याचा उंदीर हा एक आधार होता.  पण प्रत्येक व्यक्तीचे तोंड मुर्तीच्या कानाजवळ जाते. त्यातून कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. येथे येणारे अनेक पर्यटक विविध जिल्ह्यातून तसेच पश्‍चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यातील आहेत. या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे. उंदीर कोरोनाचा प्रसारक ठरु नये आणि भक्तांच्या आरोग्य रक्षणासाठी मंदिर प्रशासनाने उंदीराच्या भोवती लोखंडी कडं केले आहे. आता भक्तांना फक्त लांबून दर्शन मिळत आहे. सध्या गणपतीपुळेत तरुण वर्गच मोठ्या प्रमाणात येत आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांनो तुम्हाला आता गावातच मिळणार शेतीविषयक योजनांची माहिती 

सुविधांचा अभाव

पश्‍चिम महाराष्ट्रातून गणपतीपुळेत अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. कोरोनामुळे अजुनही येथील हॉटेल्स, लॉज पुर्णतः सुरु झालेली नाहीत. त्यामुळे खाण्या-पिण्यासह राहण्याच्या सुविधांचा अभाव वारंवार अनुभवायास मिळत आहे.

"कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. शासनाकडून अजुनही ती खुली करण्यासाठी आदेश नाहीत. पर्यटक येतात, पण बाहेरुन दर्शन घेऊन निघुन जातात."

- डॉ. विवेक भिडे, सरपंच, गणपतीपुळे देवस्थान

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to the fear of corona spreading in people the ganpatipule trust take related decision in ratnagiri