कोकणात वादळी पाऊस चुलीवर; भाताच्या सुगीवर !

सचिन माळी
Friday, 16 October 2020

गतवर्षी क्‍यार वादळामुळे अवकाळी पावसाचा प्रचंड फटका शेतीला बसला होता.

मंडणगड : मंडणगड तालुक्‍याला परतीच्या पावसाचा चांगला तडाखा बसत आहे. संध्याकाळी विजा चमकून ढगांचा गडगडाट करीत वादळी पाऊस पडत असून यात तयार झालेली भात, नाचणी पिके आडवी झाली आहेत. गतवर्षी क्‍यार वादळामुळे अवकाळी पावसाचा प्रचंड फटका शेतीला बसला होता.

‘निसर्ग’ वादळात घरांचे छप्पर उडून पावसाचे पाणी घरात, चुलीवर आले आणि आता ऐन सुगीत पिकावर. वर्षभराचे कष्ट वाया जाऊ लागल्याने तालुक्‍यातील शेतकरी उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्‍यात सुमारे ५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर भात, नाचणी पिकांची लागवड केली आहे. त्यातील शेकडो हेक्‍टर पाण्यात बाधित झाली आहे. परतीच्या पावसाचा हादगा नक्षत्र संपले असूनही पावसाने आपला मुक्काम ठोकला आहे. संध्याकाळी चारनंतर आभाळ भरून येत असून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.

हेही वाचा - अमेरिकेचा पाहुणा आला रत्नागिरीत भरकटत -

विजा चमकून ढगांचा गडगडाट होतो. तालुक्‍यात सर्वत्र भातपिके, नाचणी पसवली आहेत. वाऱ्यात दाण्यांनी भरून वजनदार झालेली पिके पावसात शेतात आडवी होत आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्याचे पाहून शेतकरी तयार झालेले पीक घरी आणण्याच्या प्रयत्नात आहे. तालुक्‍यात आतापर्यंत ३९६७ मिमी पाऊस झाला आहे. 

मंडणगडात सर्वाधिक पाउस

१५ ऑक्‍टोबर रोजी मंडणगड ९० मि.मी., म्हाप्रळ ६५ मि.मी., देव्हारे ६४ मि.मी. एकूण पाऊस २१९ मि.मी., सरासरी पाऊस ७३ मि.मी. तसेच अति मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याने प्रशासनाच्यावतीने तालुक्‍यात ॲलर्ट जाहीर केला.

हेही वाचा -  तीन दिवसांपासुन मुंबई, हर्णै, गुजरातमधील नौका बंदरातच उभ्या -

 

गंभीर परिस्थिती

- पाणथळ खलाट्यातून प्रचंड पाणी
- भात आडवे झाल्याने दाणा भिजून वाया
- उत्पादनात घट होण्याची शक्‍यता
- नाचणी, वरी पिकांनाही फटका

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to heavy rain in konkan area crop of rice lost by farmers cyclone damages last year and this year also in ratnagiri