esakal | समस्या ऑनलाइन शिक्षणाच्या ; पालक बुचकाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

during corona situation online education is option for students but upadation is very important in online education

कोरोनामुळे मात्र अशा ऑनलाइन शिक्षणपद्धतीत अपडेट राहणे गरजेचे झाले आहे

समस्या ऑनलाइन शिक्षणाच्या ; पालक बुचकाळ्यात

sakal_logo
By
राजेंद्र रांगणकर

कुर्धे ( रत्नागिरी ) : मुलांना ऑनलाइन शिक्षण हे त्यांच्या वयानुसार तेवढेच देणे गरजेचे आहे. शाळेत जाऊन मुले जे शिक्षण घेतात तो आनंद वेगळाच असतो. तो आनंद ऑनलाइन शिक्षण देऊ शकत नाही. कोरोनामुळे मात्र अशा ऑनलाइन शिक्षणपद्धतीत अपडेट राहणे गरजेचे झाले आहे.

ज्ञानमंदिरात दिले जाणारे ज्ञान जागतिक संकटामुळे बंधनात आहे. १७ मार्चपासून ही ज्ञानमंदिरे विद्यार्थ्यांविना ओस पडली आहेत. या परिस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली. पालकांना प्रश्‍न पडू लागला. शाळा कधी सुरू होणार आणि या मुलांचे शिक्षण शाळेत कधी सुरू होणार? आता पालकही मुलांच्यामुळे घरी अडून बसले. आपल्या पाल्याच्या तावडीतून आपली सुटका कशी होणार? या विवंचनेत पालक पडले.

हेही वाचा - पिवळा मळा नादखुळा ; पिवळ्या धमक हातांनी उघडली प्रगतीची कवाडे

कोरोना महामारीने मात्र जगाला बदलायला भाग पाडले. (म्हणूनच डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आठवडा) त्याचा एक भाग म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू होती. पण ती आता जोर धरू लागली. व्हॉट्‌सॲप, दीक्षा ॲप, यू ट्यूब, झूम ॲप, गुगल मीट, विविध शैक्षणिक व्हिडिओज, सीडी, चॅनेल्स, शैक्षणिक वेबसाईट यांच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी वातावरण तयार झाले. या ऑनलाइन शिक्षण पद्धतीत सर्वांना कुतूहल वाटायला लागले.

मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी अँड्रॉईड मोबाईल, टॅब, लॅपटॉप, डेस्कटॉप खरेदी केले. मुले शिक्षणात दंग झाली. नंतर समस्या यायला लागल्या. ग्रामीण भागात नेटवर्क नाही. पावसाळा सुरू झाला, वीज नाही. त्यामुळे मोबाईल चार्ज होत नाही. काही ठिकाणी झूम ॲपद्वारे शिक्षण द्यायला सुरवात झाली पण मुलांच्या गोंगाटाला आवरणे अवघड होऊन बसले. शिक्षक व्हॉट्‌सॲपवर पीडीएफ स्वरूपात पाठाची माहिती पाठवू लागले. स्वतः तयार केलेले व्हिडिओसुद्धा पाठवले.

मुलेसुद्धा या गोष्टी नवीन असल्याने आकृष्ट झाली. आता एकेक समस्या पुढे येऊ लागल्या. मुले मोबाईल, टॅब, लॅपटॉप यांचा शिक्षणासाठी वापर न करता कार्टून बघणे, इतर कार्यक्रम बघण्यात दंग होऊ लागली. शिकणे हा मूळ उद्देश बाजूला झाला. मुले या स्क्रीनवर जास्त वेळ राहिल्याने डोळ्यांच्या समस्या निर्माण झाल्या. मुलांचे मैदानी खेळावरचे लक्ष कमी झाले. व्यायाम कमी झाला. मुले मोबाईल, टीव्ही यातच अडकून पडली. सध्याच्या काळात मुलांना घरी आवरणे पालकांना अवघड होऊन बसले आहे. कारण मुले पालकांचे ऐकत नाहीत, हट्टी, चिडचिडी झाली आहेत.

हेही वाचा - शिक्षक घडविणाऱ्या ‘डीएलएड’ कडे का फिरवताहेत विद्यार्थी पाठ ?

शाळेत शिक्षकांचा एक आदरयुक्त धाक असतो. त्यामुळे मुले सांगितलेले ऐकतात, कृती करतात, आपली सर्व कामे वेळच्यावेळी आवरतात. पण सद्यःस्थितीत मुले आळशी झाल्याचे दिसून येते. या ऑनलाइन शिक्षणामुळे मुले मोबाईल सतत हाताळू लागली आहेत. स्वतःचे कवितांचे, गाण्यांचे व्हिडिओ तयार करू लागले आहेत, हा फायदा ठरू शकतो. शाळाशाळांतून उपक्रम राबवून मुलांना मिळणारा आनंद या कोरोनामुळे कमी होऊ लागला आहे. यातूनही शिक्षक मार्ग काढतील कारण बदलावर विश्‍वास ठेवला पाहिजे.

संपादन - स्नेहल कदम 

loading image