सावंतवाडी उपनगराध्यक्षपदी कोरगावकरच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

सावंतवाडी - येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे अन्नपूर्णा कोरगावकर या दहा मतांनी निवडून आल्या; तर काँग्रेसचे उमेदवार राजू बेग यांना ८ मतांवर समाधान मानावे लागले. स्वीकृत म्हणून काँग्रेसच्या डॉ. जयेंद्र परुळेकर यांना तर भाजपकडून मनोज नाईक यांना संधी मिळाली.
काँग्रेसकडे संख्याबळ कमी असताना त्यांनी उपनगराध्यक्ष निवडीसाठी श्री. बेग यांचा अर्ज भरला. काँग्रेसने गुप्त मतदान घेण्याची मागणी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याकडे केली; मात्र ती मागणी फेटाळून लावत श्री. साळगावकर यांनी हात उंचावून मतदान प्रक्रिया राबवली.

सावंतवाडी - येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे अन्नपूर्णा कोरगावकर या दहा मतांनी निवडून आल्या; तर काँग्रेसचे उमेदवार राजू बेग यांना ८ मतांवर समाधान मानावे लागले. स्वीकृत म्हणून काँग्रेसच्या डॉ. जयेंद्र परुळेकर यांना तर भाजपकडून मनोज नाईक यांना संधी मिळाली.
काँग्रेसकडे संख्याबळ कमी असताना त्यांनी उपनगराध्यक्ष निवडीसाठी श्री. बेग यांचा अर्ज भरला. काँग्रेसने गुप्त मतदान घेण्याची मागणी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याकडे केली; मात्र ती मागणी फेटाळून लावत श्री. साळगावकर यांनी हात उंचावून मतदान प्रक्रिया राबवली.

येथील पालिकेची पुढे ढकलण्यात आलेली उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज घेण्यात आली. यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करून युतीकडून सौ. कोरगावकर यांना संधी देण्यात आली होती. स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज नाईक यांचे नाव सुचवण्यात आले होते. दुसरीकडे काँग्रेसकडून जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे नाव निश्‍चित केले होते. या सर्व प्रक्रियेनंतर आज सकाळी उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. या वेळी काँग्रेसकडून दावा करण्यात आल्याप्रमाणे उपनगराध्यक्षपदासाठी राजू बेग यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यामुळे नियमानुसार दुपारी अडीच वाजेपर्यंत सर्व प्रक्रिया पार पडली.

त्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेवेळी पीठासीन अधिकारी श्री. साळगावकर यांनी हात उंचावून मतदान घ्यावे, अशा सूचना सभागृहाला केल्या. 

या प्रक्रियेला विरोधी गटाचे नगरसेवक परिमल नाईक यांनी विरोध केला. श्री. साळगावकर यांनी पालिका अधिनियमानुसार ही प्रक्रिया आहे, असे सांगून त्यांची मागणी फेटाळून लावली.

त्यानंतर मतदान प्रक्रिया झाली. यात सत्ताधारी नऊ नगरसेवकांसह नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे एक मत अशी दहा मते कोरगावकर यांना मिळाली. काँग्रेसकडे आठचे संख्याबळ असल्यामुळे बेग यांना आठ मतांवर समाधान मानावे लागले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून श्री. नाईक आणि डॉ. परुळेकर यांचे नाव जाहीर करण्यात आले.

या वेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, भारती मोरे, दीपाली सावंत, अनारोजीन लोबो, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, सौ. माधुरी वाडकर यांच्यासह विरोधी गटाचे परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, नासीर शेख, दीपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होत्या.

रंगली जुगलबंदी 
मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर साळगावकर यांनी हात उंचावून मतदान करण्याच्या सूचना केल्या. त्याला परिमल नाईक यांनी आक्षेप घेत गुप्त मतदान घेण्याची मागणी केली. या वेळी साळगावकर यांनी अधिनियमाची कॉपी वाचून दाखविली. ती पुन्हा खात्री करण्यासाठी श्री. नाईक यांनी आपल्याकडे घेतली व शब्दात खेळ असतो. त्यामुळे वाचले पाहिजे, असे सांगत वाचण्यास सुरवात केली. या वेळी हात उंचावून मतदान केले पाहिजे; मात्र कोणता हात वर करावा हे त्यात लिहिलेले नाही असे साळगावकर यांनी नाईक यांना सांगितले. नाईक यांनी कोणता हात वर करायचा हे नंतर बघू, पहिले हाताचे तर बघूया असे सांगितले. यावरून नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी दोन्ही हात वर करूया असा टोला मारला. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुगलबंदी रंगल्याचे दिसले.

राजू बेग वीस वर्षांनी विरोधी बाकावर 
यातील विरोधी गटाचे नगरसेवक राजू बेग हे आजपर्यंत तब्बल वीस वर्षे आमदार केसरकर यांच्यासोबत सत्तेतच राहिले आहेत; मात्र केसरकर शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आज वीस वर्षांनी ते विरोधकांच्या खुर्चीत बसल्याची चर्चा सभागृहात होती.

Web Title: dy. mayor annapurna koregavkar