सिंधुदुर्गातील नुकसानग्रस्त शेतीसाठी वाढीव भरपाईचे प्रयत्न 

विनोद दळवी
Tuesday, 20 October 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. त्यांना जादा मदतीसाठी साकडे घालू.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आठ दिवसांत पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर येतील. त्यांच्यासमोर अहवाल मांडला जाईल. वाढीव भरपाईसाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. दिवसभर शेती नुकसानीची पाहणी केली असून गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेती बाधित झाली असल्याचे निदर्शनास आल्याचे ते म्हणाले. 

सामंत यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, नागेंद्र परब, विकास कुडाळकर, जान्हवी सावंत, संदेश पारकर होते. सामंत म्हणाले, "जिल्ह्यात गतवर्षी 40 हजार हेक्‍टर भातशेतीचे नुकसान झाले होते. यावर्षी 61 हजार हेक्‍टरवर भात शेती आहे. भातासोबत नाचणीसह आंबा, सुपारीचेही नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामे होतील. मुख्यमंत्री ठाकरे लवकरच कोकण दौऱ्यावर येत आहेत. ते जिल्ह्यातही येतील. नुकसानीचा अहवाल त्यांना सादर करणार आहे.'' 

ते म्हणाले, "काही अधिकारी-कर्मचारी बांधावर येऊन पंचनामे करणार नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशांवर कारवाई होईल. खारेपाटण तलाठ्यावर कारवाई करून याची सुरुवात केली आहे. गतवर्षीच्या नुकसानीची मदत काही ठिकाणी पोहोचली नसल्याच्या तक्रारी होत्या. याबाबत आढावा घेतला असता कुडाळ व सावंतवाडी मतदारसंघात 95 टक्के वाटप झाल्याचे स्पष्ट झाले. कणकवलीत तक्रारी जास्त होत्या. जागृत लोकप्रतिनिधी असलेल्या ठिकाणी मदत पोहोचली आहे. जे लोकप्रतिनिधी जागृत नाहीत तिथे मी स्वतः लक्ष घातले आहे.'' 

ते म्हणाले, "आजअखेर 10 हजार हेक्‍टरचे पंचनामे पूर्ण आहेत. तीन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील. त्यावेळी निश्‍चित आकडा दिसेल; परंतु गेल्या वर्षापेक्षा जास्त मदत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात नवीन 18 महसूल मंडळे तयार करण्यात आली आहेत. तेथे स्वतंत्र पर्जन्यमापक बसविण्यात येणार आहेत. त्याचा आकृतिबंध तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.'' 

निसर्ग वादळग्रस्तांना  दीड कोटींची मदत 
निसर्ग वादळ झाल्यानंतर जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 कोटींची मदत जाहीर केली होती. मात्र, ती मदत अद्याप पोहोचली नसल्याकडे लक्ष वेधले असता मंत्री सामंत म्हणाले, "जिल्ह्यात जास्त नुकसान झाले नव्हते. त्यामुळे केवळ दीड कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे; मात्र नुकसान झालेल्या एकाही बाधिताला वंचित ठेवण्यात आलेले नाही.'' 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Efforts for increased compensation for damaged agriculture in Sindhudurg