esakal | रत्नागिरीत आत्माद्वारे हापूसची आठ कोटींची उलाढाल
sakal

बोलून बातमी शोधा

Eight crore turnover of hapus by Atma in Ratnagiri Ratnagiri Marathi News

लॉकडाउनमुळे देशातंर्गत सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे यंदा कोकणच्या हापूसच्या विक्रीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील कृषीमधील "आत्मा'विभाग बागायतदारांच्या मदतीला सरसावाला. त्यामुळे मार्चचा शेवटचा आठवडा आणि एप्रिल महिना या कालावधीत जिल्ह्यातून साठ हजार हापूसच्या पेट्यांची विक्री राज्यात व राज्याबाहेर करण्यात आली. यामधून सुमारे आठ कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे

रत्नागिरीत आत्माद्वारे हापूसची आठ कोटींची उलाढाल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी, : लॉकडाउनमुळे देशातंर्गत सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे यंदा कोकणच्या हापूसच्या विक्रीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील कृषीमधील "आत्मा'विभाग बागायतदारांच्या मदतीला सरसावाला. त्यामुळे मार्चचा शेवटचा आठवडा आणि एप्रिल महिना या कालावधीत जिल्ह्यातून साठ हजार हापूसच्या पेट्यांची विक्री राज्यात व राज्याबाहेर करण्यात आली. यामधून सुमारे आठ कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

बदलत्या हवामानामुळे यंदा बागायतदार अडचणीत असतानाच कोरोनाने पाय पसरले. दीड महिना उशिराने पीक आल्यामुळे लॉकडाऊनच्या स्थितीत विक्री यंत्रणा कशी राबवायची हा प्रश्‍न उभा राहिला होता. मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी मागणी असूनही ग्राहकांपर्यंत आंबे पोचवणे शक्‍य नाही. पणन व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या आंबा विक्रीसाठी प्रयत्न सुरू केले.

रत्नागिरीतील आत्मा विभागाने राज्यांतग विक्रीसाठी त्या-त्या जिल्ह्यातील आत्मा विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले. शेतकरी गट, गृहनिर्माण सोसायटी यांच्याशी संपर्क साधून आंबा विक्रीची थेट साखळी उभारली. पैसे ऑनलाईनने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होते. शेतमाल विक्रीला लॉकडाउनमध्ये मुभा मिळाल्यानंतर अनेक परजिल्ह्यातील व्यावसायिकांनी बागायतदारांच्या थेट बागेतूनच पेट्या विकत घेतल्या. त्याचा फायदा झाला असून हापूसचे दर स्थिर राहीले. 

यंदा हंगामाच्या सुरूवातीला वाशी मार्केट सुरू होणार की नाही असा प्रश्‍न होता. त्यावेळी आत्माने ग्राहक मिळवून दिले. प्रारंभी डझनाला 350 रुपयाप्रमाणे चार डझनाची पेटी 1400 रुपयांनी विकली. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यानंतर हळूहळू दर वधारू लागले आणि डझनचा दर अगदी सातशे रुपयांपर्यंत पोचला होता. आत्मा'च्या कराड, सातारा, फलटण, पंढरपूर, पुणे, कल्याण, बोरीवली, ठाणे, सोलापूर, पालघर, औरंगाबाद या महाराष्ट्रातील जिल्ह्यांबरोबरच गोवा व हैद्राबाद येथेही आंबा पाठविण्यात आला. मिलट्री, नेव्हीतील अधिकाऱ्यांसह सोलापूर पोलिस वेल्फेअर सोसायटीकडूनही आंब्यासाठी मागणी आली होती. यामधून सुमारे साठ हजार पेट्या सव्वा महिन्याच्या कालावधीत ग्राहकांपर्यंत पोचण्यात आल्या आहेत. 

दर स्थिर
मुंबई, पुणे येथे व्यापाऱ्यांनी आंबा विक्री सुरू ठेवली होती; परंतु समाधानकारक प्रतिसाद नव्हता. झाडावर तयार झालेला आंब्याला दर मिळणे अशक्‍य होते. या परिस्थिती "आत्मा'ने विक्रीसाठी यंत्रणा निर्माण केली. मोठ्या शहरातील शेतकरी गट, गृहनिर्माण सोसायटींशी संपर्क साधून थेट ग्राहकांच्या घरात हापूस पोचला. त्यावेळच्या प्रयत्नामुळे सध्या बाजारातील दर स्थिर असून हापूसला मागणी वाढली. 
- जी. बी. काळे, उपविभागीय कृषी अधिकारी