मालवण दुर्घटना: त्या तरुणांना अतिउत्साह नडला

Eight students drowned in Malvan
Eight students drowned in Malvan

मालवण : वायरी येथील दुर्घटनेनंतर सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेत पर्यटकांचा अतिउत्साह नडल्याचे पुढे आले आहे. 

सिंधुदुर्गातील किनारपट्टीवर सुमारे 30 किनारे आहेत. मात्र पर्यटकांच्या नजरेत असलेले तारकर्ली, मालवण, वायरी, आरवली, वेळागर, निवती, म्हापण, कुणकेश्‍वर, विजयदुर्ग, चिवला बिच आदी ठराविक किनारेच आहेत. या आधी अनेकदा पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. बहुसंख्य घटनांमध्ये पर्यटकांनी दाखविलेला अतिउत्साह नडल्याचे पुढे येते. असे असले तरी जीवनरक्षक नेमून सुरक्षा उपाय योजणे आवश्‍यक आहे. सद्यस्थितीत असे उपाय योजले असले तरी त्याला मर्यादा आहेत. या घटनेतही वायरी-जाधववाडी किनाऱ्यावर दोन जीवनरक्षक नेमण्यात आले होते. मात्र ते रिसॉर्ट असलेल्या व बहुसंख्य पर्यटक पोहण्यासाठी उतरत असलेल्या भागात कार्यरत होते. बेळगावमधील या ग्रुपने या स्थळापासून दूर असलेला किनारा निवडला. 

उपलब्ध माहितीनुसार, इंजिनिअरींगचा हा ग्रुप पुण्यातील इंडस्ट्रीअल व्हिजीट आटोपून पर्यटनासाठी म्हणून आज सकाळीच मालवणात दाखल झाला. यातील 20 ते 25 जण पोहण्यासाठी अकराच्या दरम्यान समुद्रात उतरले. स्थानिक मच्छीमारांनी भरती-ओहोटीचे गणित सांगून जास्त खोल समुद्रात जाणे धोकादायक असल्याची सूचना त्यांना केली होती. घटनास्थळाच्या जवळ धोका दर्शविणारा फलकही लावलेला आहे. हा ग्रुप यानंतर पाण्याबाहेर आला. मात्र त्यातील काहीजण पुन्हा समुद्रात उतरले. 

काही किनाऱ्याजवळ तर काहीजण खोल समुद्राच्या दिशेने गेले. एका मोठ्या लाटेबरोबर ते पाण्यात ओढले गेले. किनाऱ्याजवळ असलेल्यांनी आरडा-ओरडा सुरू केला. तेथे असलेले मच्छीमार नारायण तोडणकर आणि श्‍यामसुंदर सारंग या दोघांनी जीवावर उदार होवून समुद्रात उड्या घेतल्या. त्यांनी 11 पैकी तिघांना वाचविले. अन्य आठ जणांनाही पाण्याबाहेर आणले. मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये एका प्राध्यापकाचाही समावेश आहे. मृतामध्ये तीन तरुणी आणि चार तरुण तसेच प्राध्यापक महेश कुदडरकर यांचा समावेश आहे. 

अति उत्साहाला उपाय काय?
विस्तीर्ण किनाऱ्यावर किती जीवनरक्षक नेमावे यालाही मर्यादा आहेत. किनारा दिसला की पर्यटक पोहायला उतरतात. तेथील सुरक्षा व्यवस्था, इथल्या सूचना फलकांचा विचार केला जात नाही. यामुळे जीवनरक्षक किंवा अन्य सुरक्षा व्यवस्था उभी केली, तरीही पर्यटकांच्या अतिउत्साहाला थोपवायचे कसे, हा प्रश्‍न पर्यटन क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर आहे. 

मृतांची नावे:

  • मुजमीन अनिकेत
  • किरण खांडेकर 
  • आरती चव्हाण 
  • अवधूत 
  • नितीन मुत्नाडकर 
  • करुणा बेर्डे 
  • माया कोल्हे 
  • महेश

अत्यवस्थ

  • संकेत गाडवी
  • अनिता हानली
  • आकांक्षा घाडगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com