
दोडामार्गः हत्तीपकड मोहिमेबाबत वन विभागाच्या मोहिमेविरोधात सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी दोडामार्ग वनविभाग कार्यालयात कालपासून (ता. २) ठिय्या आंदोलन छेडले. उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी याबाबत १० रोजी बैठक घेऊन सखोल माहिती देण्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलन आज (ता. ३) स्थगित केले. बैठकीदरम्यान शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे व हत्ती पकड मोहिमेबाबत अंतिम तारीख जाहीर केली नसल्यास शेतकऱ्यांसमवेत कार्यालयात पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा श्री. गवस यांच्यासमवेत बाबूराव धुरी, दीपक गवस, वैभव इनामदार, सरपंच संजना धुमसकर यांनी दिला.
तालुक्यातील मोर्ले गावातील एका शेतकऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात बळी गेला होता. त्यानंतर संतप्त स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व तालुक्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उठावानंतर हत्ती पकड मोहिमेचे आदेश दिले होते. मात्र, दोन महिने लोटले तरी मोहिमेबाबत अंतिम तारीख अद्यापही वन विभागाकडून जाहीर करण्यात आली नाही. प्रत्येकवेळी माहिती मिळवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद त्या अधिकाऱ्यांकडून मिळाला नाही. त्यामुळे प्रवीण गवस यांनी सोमवारी (ता.२) सायंकाळी तीन वाजता वनविभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले होते.
ते म्हणाले, ‘शेतकऱ्याचा बळी गेल्यानंतर पालकमंत्री नीतेश राणे यांनी ‘ओंकार’ हत्तीला पकडण्यासाठीचा आदेश दिला. ३० जूनपर्यंत त्या हत्तीला पकडून दुसऱ्या जागेत नेण्यासंदर्भात लेखी पत्र देऊन दोन महिने लोटले आहेत. मात्र, सोयरसुतक नसलेल्या वन विभागाने हत्ती पकड मोहिमेबाबत कोणतीच पावले उचलली नाहीत. वन विभागाने जातीनिशी लक्ष घालून हत्ती पकड मोहीम एवढ्यात राबविली पाहिजे होती. मात्र, वन विभागाकडून कोणतीही कार्यवाही केलेली नाही.’
दरम्यान, सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी या आंदोलनाला भेट दिली. त्यांनी यासंदर्भात वरिष्ठच आपल्याला सखोल माहिती देऊ शकतात, असे सांगितले. त्यावर जर वरिष्ठच माहिती देऊ शकत असतील, तर ते आल्याशिवाय मी इथून उठणार नाही. वरिष्ठांकडून जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा गवस यांनी घेत आंदोलन सुरूच ठेवले होते.
आज सायंकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, सामाजिक कार्यकर्ते वैभव इनामदार यांनी आंदोलनस्थळी येऊन यशस्वी शिष्टाई केली. उपवनसंरक्षक रेड्डी यांनी श्री. गवस यांना लेखी पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, ‘नियोजित हत्ती पकड मोहिमेच्या अनुषंगाने वन विभागामार्फत सुरू असलेली आवश्यक तयारी, नियोजन व कार्यवाहीसंदर्भात चर्चा करण्यासाठी १० जूनला वन विभाग कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर हे देखील उपस्थित राहणार आहेत.'
हे लेखी पत्र मिळताच ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, होणाऱ्या बैठकीत शेतकरी, ग्रामस्थ यांना या मोहिमेबाबत इत्यंभूत माहिती देण्यास अधिकाऱ्याने टाळाटाळ केली किंवा हत्ती पकड मोहिमेची तारीख जाहीर न केल्यास पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा दिलेला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबूराव धुरी, भाजप तालुका अध्यक्ष दीपक गवस, मोर्ले सरपंच संजना धुमसकर, सामाजिक कार्यकर्ते वैभव इनामदार, दत्ताराम देसाई, सुमित गवस, उपवनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल वैशाली मंडळ उपस्थित होते.
...अन्यथा कार्यालयाला टाळे
शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबूराव धुरी, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, सामाजिक कार्यकर्ते वैभव इनामदार यांनीदेखील वन विभागाला अल्टिमेट दिले आहे. १० जूनला होणाऱ्या बैठकीची सर्वस्वी जबाबदारी आपण घेत असल्याचे सांगत श्री. गवस यांना तब्बल २७ तास चाललेले ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावर ते म्हणाले, ‘वन विभाग जर लोकांची दिशाभूल करत असेल आणि हत्तीबाधित शेतकऱ्यांना हत्ती पकड मोहिमेबाबत कोणतीही माहिती देत नसतील तर पुढील होणाऱ्या परिणामांना वन विभाग जबाबदार असेल. १० रोजीच्या बैठकीला सक्षम उत्तरे देणारे अधिकारी उपस्थित राहणार नसतील तर शेकडो शेतकऱ्यांना घेऊन वन विभाग दोडामार्ग येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडणार आहोत. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार वन विभागाचे अधिकारी राहणार आहेत. वेळ पडल्यास वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.