रत्नागिरीत रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर होतोय परिणाम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

तालुक्‍यातील जनतेचे आरोग्य सांभाळणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे.

खेड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तालुका आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. तालुक्‍यातील जनतेचे आरोग्य सांभाळणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. तालुक्‍यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 48 आरोग्य उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. तालुक्‍यासाठी मंजूर असलेल्या एकूण विविध प्रकारच्या 190 पदांपैकी 63 पदे रिक्त आहेत. 

हेही वाचा - मी नक्की बरी होणार ; मानसिक आरोग्याने कॅन्सरवर मात 

तालुक्‍यात आंबवली, लोटे, फुरुस, तळे, वावे, तिसंगी, कोरेगाव आणि शिव अशी आठ प्राथमिक आरोग्यकेंद्रे असून, या केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन अशी 16 वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्‍यकता आहे. यापैकी 15 पदे भरली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या आरोग्य उपकेंद्रांसाठी मंजूर 49 आरोग्य सेवकांपैकी 33 पदे भरली असून 16 पदे रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्वच्छतेसाठी आवश्‍यक असलेल्या 8 सफाई कामगारांपैकी 3 कामगार कार्यरत आहेत. तर 33 परिचरांपैकी 13 पदे रिक्त आहेत. आरोग्य उपकेंद्रांसाठी मंजूर असलेल्या 56 आरोग्यसेविकांपैकी 38 पदे भरली असून 18 पदे रिक्त असल्याने कार्यरत आरोग्यसेविकांना तारेवरची कसरत करावी लागते. 

प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकाऱ्यांची आवश्‍यक असलेली 8 पदे मंजूर आहेत; मात्र यापैकी 5 पदे रिक्त आहेत. कनिष्ठ सहाय्यकांची 9 पदे तालुक्‍यासाठी मंजूर असली तरी 5 पदे भरलेली असून 4 रिक्त आहेत. तालुका आरोग्य कार्यालयातील 2 आरोग्य पर्यवेक्षक पदांपैकी एक रिक्त आहे. सध्या केवळ 110 कर्मचाऱ्यांना संपूर्ण तालुक्‍यातील जनतेला सेवा द्यावी लागते. 

हेही वाचा -  ऑनलाइन शिक्षणात रेंजचा अडथळा ; कोकणात विद्यार्थ्यांना मिळतोय माळरानाचा आधार 

17 कर्मचारी पॉझिटिव्ह 

कोरोनाचा शिरकाव तालुका आरोग्य विभागात झाला असून तब्बल 17 कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले. यामुळे अगोदरच कर्मचाऱ्यांचा तुटवडा त्यामध्ये आणखी 17 कर्मचारी बाधित झाल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. तालुक्‍यात बाधित रुग्णांची संख्या 1,064 झाली असून 218 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: empty post of medical officers effects on hospital services its dangerous for patients and employees