प्रखर ऊन, घामाच्या धारा... प्रतीक्षेत रात्रही काढली रस्त्यावर!!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी पालकांचा २८ तासांचा संघर्ष

सावर्डे - कोणाचा मुलगा, कोणाचा नातू, कोणाची नात तर कोणाची मुलगी; साऱ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा अर्थात नर्सरीप्रवेश. त्यासाठी पालक २८ तास रांगेत थांबले. तीव्र ऊन, घामाच्या धारा आणि नाइलाजाने आडवे होण्यासाठी रस्त्याचा आसरा असा संघर्ष करून ७५ पालकांनी डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या इंग्लिश मीडियम शाळेत पाल्याचा प्रवेश मिळवला.

काल (ता. ९) पहाटे प्रवेशासाठी पालकांनी शाळेच्या समोर संरक्षक भिंतीपलीकडे रस्त्यावर रांग लावली. प्रखर उन्हात आणि त्यानंतर रात्रभर रांगेत उभे राहण्याची वेळ आली. आपला क्रमांक जाऊ नये म्हणून रांगेतील काही जणांनी रस्त्यावरच रात्री पथाऱ्या पसरल्या; पण प्रवेशाची शर्यत जिंकली. आपला पाल्य शिकून मोठा झाला पाहिजे, भविष्यात त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, अशी स्वप्ने व अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडे वाढत आहे. शाळेची गुणवत्ता व खेळाची परंपरा आणि सुविधा असल्यामुळे डेरवण येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेला पालकांची प्रथम पसंती होती. नंबरासाठी जीवतोड करणाऱ्या पालकांमध्ये महिलांचाही समावेश होता. पालक रांगेत अदलाबदली करून उभे राहत होते. आज सकाळी शाळेचे फाटक उघडण्यात आले. त्यानंतर पालकांना रांगेतच अर्जवाटप करण्यात आले. ६० नियमित, तर जादा १५ असे ७५ अर्ज वितरित करण्यात आले. मात्र काही पालकांना नाराज होऊन परतावे लागले.

इंग्रजी माध्यमाच्या आमच्या शाळेचे कार्य अतिशय पारदर्शक आहे. विद्यार्थ्यांसाठी जास्त वेळ शाळा भरवली जाते. कमी सुट्या, पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असल्याने पालकांची आमच्या शाळेला पसंती मिळते.
- शरयू यशवंतराव, संचालिका, एसव्हीजेसीटी

डेरवण शाळेचे विविध उपक्रम, दर्जेदार शिक्षण, योग्य सोयीसुविधांमुळे माझ्या मुलाला याच शाळेत प्रवेश मिळावा, ही अपेक्षा आहे. सध्या तरी प्रतीक्षा यादीत आहे.
- अमित सुर्वे (पालक)

Web Title: english medium school admission issue