बांद्यातील 17 पोलिसांची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

वादग्रस्त ठरलेल्या येथील पोलिस ठाण्यातील तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह तब्बल 17 जणांची खातेनिहाय चौकशी लागली आहे. जिल्ह्यातील अलिकडच्या काळात एकाच पोलिस ठाण्यात इतक्‍या मोठ्या प्रमाणात चौकशी लागण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. यातील काही जणांवर गंभीर स्वरुपाचे आरोप असल्याचे समजते.

बांदा - वादग्रस्त ठरलेल्या येथील पोलिस ठाण्यातील तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह तब्बल 17 जणांची खातेनिहाय चौकशी लागली आहे. जिल्ह्यातील अलिकडच्या काळात एकाच पोलिस ठाण्यात इतक्‍या मोठ्या प्रमाणात चौकशी लागण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. यातील काही जणांवर गंभीर स्वरुपाचे आरोप असल्याचे समजते.

गेले वर्षभर बांदा पोलीस स्थानकातील अधिकारी, कर्मचारी विविध प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरले आहे. येथील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक, उपनिरिक्षक आणि इतर 15 पोलीस कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी अतिरिक्त अधीक्षकांकडे चालु आहे. यात ड्युटीवर असताना आर्थिक साटेलोटे केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांच्या आदेशानंतर या 58 पैकी 17 जणांची चौकशीचे काम अतिरीक्त पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड करीत आहे. त्यामुळे बांदा पोलीस स्थानक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तर या प्रकारामुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. यावर आत्ताच नव्याने अधिक्षक म्हणुन आलेले दिक्षीतकुमार गेडाम कोणती कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

येथील काही कर्मचाऱ्यांनी विशेषतः या पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या इन्सुली तपासणी नाक्‍यावर वाहनधारकांना अक्षरशः लुबाडण्याचे काम केल्याचे आरोप होत होते. यातून एका बड्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबसुद्धा सुटले नाही. या प्रकरणानंतर तत्कालीन पोलीस अधिक्षक अमोघ गांवकर यांनी येथील पैसे उकळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिक्षक दयानंद गवस यांनी रात्री दहाच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल धनाजी धडे यांच्यावर एका वाहनधारकाकडून 100 रूपये घेत असताना रंगेहाथ पकडले. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या एकुण अन्य तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यात ते चारही पोलीस कर्मचारी निलंबित झाले. यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरिक्षकांना पोलीस प्रशानाकडून 'क्‍लीनचीट' देण्यात आली होती. त्याबाबत परिसरात मोठी उलट सुलट चर्चा सुरू होती. यानंतर अवघ्या काही महिन्यातच सावंतवाडी येथील व्यावसायिकाकडून याच तपासणीनाक्‍यावर तब्बल पंधरा हजार रूपये मागितल्याचे उघड झाले. याप्रकरणी त्या दोघा कर्मचाऱ्यांना तात्काळ मुख्यालयात हजर होण्याचे आदेश अधीक्षकांनी दिले होते. त्याचाही यात समावेश आहे.

एवढी मोठी प्रकरणे होऊनही येथील झारीतील शुक्राचार्यांवर काहीच परिणाम झाला नाही. या प्रकरणामुळे हाताच्या बोटावर मोजण्या एवढे कर्मचारी बदनाम असल्याने सिंधुदुर्ग पोलीस दलाची बदनामी होत होती. पोलीस स्थानकातील काही कर्मचारी तर इतर कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याचीही चर्चा बांदा शहरात असायची. या प्रकरणी येथील प्रभारी अधिकाऱ्यांबाबत पोलीस अधिक्षकांकडे कर्मचाऱ्यांनी दाद मागितली होती.

बांदा पोलीस स्थानक महाराष्ट्र-गोवा सीमेवर असल्याने या भागातुन मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतुक येथील काहींच्या आशिर्वादाने सुरू असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. गोवा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू कारवाई केली असली तरी येथील कर्मचारी तेथे लागलीच पोचतात. रात्रीच्या वेळी अवैध दारू वाहतुकदारांना छुप्या पध्दतीने दारू वाहतुकीस वाट मोकळी करून दिली जात असे. यातून लाखोंची उलाढाल होत असल्याची चर्चा होती. यावर मधल्या काळात तत्कालीन पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांनी बरेच निर्बंध आणले होते. यात पोलीत सहाय्यक निरिक्षकांची तडकाफडकी बदली केली; मात्र असे असतानाही त्यावेळी झारीतील शुक्राचार्य असलेल्या कर्मचाऱ्यांवर खात्यांतर्गत चौकशीची कुऱ्हाड कोसळली आहे. यात एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, एक उपनिरीक्षक आणि 15 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार याची प्राथमिक चौकशी झाली आहे. याबात चौकशी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की आपण चौकशी केली असून याबाबतची माहीती गोपनीयतेच्या कारणास्तव देवू शकत नाही.

चाप बसला पण...
पोलीस अधिक्षक अमोघ गांवकर यांनी बांदा तपासणी नाक्‍यावर गेली कित्येक वर्षे सुरू असलेले 'एंट्री' कलेक्‍शन कारवाई करत बंद पाडले होते. कर्तव्यात कसुर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करत एक वेगळा दरारा निर्माण केला होता. यात नेहमी चर्चेत राहीले ते बांदा पोलीस स्थानक. नुकतेच पदभार स्विकारलेले पोलिस अधिक्षक गेडाम यात सातत्य ठेवतील काय असा सवाल या निमित्ताने पुढे येत आहे.

''बांदा पोलिस ठाण्यातील एकुण सतरा कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे. यात तपासणी नाक्‍यावर वाहन धारकाकडून पैसे मागितल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. चौकशी झाल्यानंतर दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करून कारवाई करणार आहे.''
- प्रकाश गायकवाड, अतिरिक्त पोलीस अधिक्षक

Web Title: Enquiry of 17 police Police personnel in banda