नरीमन पॉईंटच्या धर्तीवर `या` ठिकाणी होणार बंधारा  

राजेश शेळके
Monday, 17 August 2020

मिऱ्या येथील काही गावांचे संरक्षण सुमारे साडेतीन किमीचा धुपप्रतिबंधक बंधारा करतो. मिऱ्या बंधाऱ्याचे दुखणे गेली अनेकवर्षे कायम आहे. दरवर्षी मिऱ्यावासियांनासाठी उधाणाची भरती धोक्‍याची ठरते. आता रहिवाशांच्या सात - बारा उताऱ्यावर समुद्र आला आहे.

रत्नागिरी - मुंबईच्या नरीमन पॉइंटच्या धर्तीवर मिऱ्या येथे बांधण्यात येणाऱ्या 190 कोटीच्या पक्‍क्‍या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. मोनार्च या कन्सल्टंट कंपनीने केलेल्या या डीपीआरचे लवकरच प्रेझेंटेशन होणार आहे. सूचना, हरकतीचा विचार करून डीपीआर निश्‍चित झाल्यानंतर शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. सीआरझेडचा नाहरकत मिळवून मे 2021 पर्यंत कामाची वर्क ऑर्डर देण्याच्या हालचाली पत्तन विभागाच्या आहेत. 

मिऱ्या येथील काही गावांचे संरक्षण सुमारे साडेतीन किमीचा धुपप्रतिबंधक बंधारा करतो. मिऱ्या बंधाऱ्याचे दुखणे गेली अनेकवर्षे कायम आहे. दरवर्षी मिऱ्यावासियांनासाठी उधाणाची भरती धोक्‍याची ठरते. आता रहिवाशांच्या सात - बारा उताऱ्यावर समुद्र आला आहे. या परिसरात कामयस्वरूपी पक्का बंधार व्हावा यासाठी मिऱ्यावासीयांनी आंदोलन केले. त्याला यश आले आणि शासनाने दखल घेत 190 कोटीच्या पक्‍क्‍या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजूरी दिली. 

मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पुणे येथील मोनार्च कन्सल्टन्सीकडे दिले होते. काही महिन्यापूर्वी या कंपनीचे तज्ज्ञ रत्नागिरी येऊ गेले. मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा सविस्तर अहवाल एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल झाल्याने त्यात कोणते बदल आवश्‍यक आहेत का किंवा अन्य कार्यवाहीसाठी हा अहवाल पुणे, खडकवासला येथील सेंट्रक वॉटर ऍण्ड पॉवर रिसर्च स्टेशन (सीडब्ल्यूपीआरएस) कडे पाठविण्यात आला आहे.

मिऱ्या किनारपट्टीवर धूप कशामुळे होते. ती थोपवण्यासाठी कायमस्वरूपी काय उपाययोजना कराव्यात याचा अभ्यास करण्यात आला आहे. मच्छीमारांचे प्रश्‍न आणि पर्यावरण विषयकही काही बाबींचा विचार अहवालात केला आहे. कॅबिनेट मंत्री उदय सामंत, खासदरा विनायक राऊत, स्थानिक ग्रामस्थ, अधिकारी आदींपुढे पंधरा दिवसात याचे प्रेझेंटेशन होणार आहे. 

मे 2021 पर्यंत वर्कऑर्डर देण्याचा प्रयत्न 
नरीमल पॉईंटच्या धर्तीवर मिऱ्याचा बंधारा होणार आहे. शुक्रवारी मोनार्च कंपनीने डीपीआर सादर केला. प्रेझेंटेशन घेऊन काही बदल आदीचा विचार करून अंतिम अहवाल मंजूरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर सीआरझेडची मंजूरी महत्त्वाची आहे. या सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून मे 2021 पर्यंत मिऱ्या बंधाऱ्याच्या कामाची वर्क ऑर्डर देण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत, अशी माहिती पत्तन अभियंता एस. ए. चौधरी यांनी दिली. 

 

संपादन - राजेंद्र घोरपडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Erosion Prevention Construction In Mirya Beach On The Basis Of Nariman Point