पालीमध्ये मोटारसायकलच्या धडकेत वृद्ध पादचार्‍याचा मृत्यू

अमित गवळे
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

पालीत धुमस्टाईल मोटार सायकलस्वारांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करुन बेदरकारपणे मोटारसायकल चालविल्या जातात. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत तसेच रहदारीच्या वेळी सर्वात जास्त धोका उद्भवतो. अशा वेळी नाक्यांवर तसेच शाळा परिसरात वाहतुक पोलीस तैनात असणे गरजेचे आहे. या संदर्भात पाली पोलिस्थानकात अनेक वेळा निवेदन दिले आहे. परंतू कोणतीच कारवाई केली जात नाही. याची पोलीसांनी गंभीर दखल घेवून संबधितांवर योग्य ती कारवाई करावी.

- सुशिल शिंदे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, पाली शहर)

पाली : पालीमध्ये मोटारसायकलची धडक बसून शनिवारी (ता.11) एका वृद्ध पादचार्याचा दुर्देंवी मृत्यू झाला. एकनाथ महादू सकपाळ (वय 65) रा.वावळोली यांचा अपघातात मृत्य़ झाला आहे. संबधीत मोटारसायकल चालकावर तातडीने कारवाई व्हावी या मागणीकरीता मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह रविवारी(ता.१२) पाली पोलीस स्थानकासमोर आणला होता. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

यासंदर्भात पाली पोलीस स्थानकात संजय घोसाळकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार (ता.11) सायंकाळी 7.40 वाजेच्या सुमारास मोटारसायकलस्वार बल्लाळेश्वर मंदीराकडून लवाटे कॉर्नरकडे जाणार्‍या मार्गाने बेदरकारपणे जात होता. मोटारसायकलस्वार चुकीच्या दिशेने जावून तेथून जाणारे पादचारी एकनाथ सकपाळ यांना धक्का देऊन निघुन गेला. जखमी झालेल्या सकपाळ यांना उपचारासाठी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तर अधिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी जखमी एकनाथ सकपाळ यांना मृत घोषित केले. संतप्त मृताच्या नातेवाईकांनी रविवारी (ता.१२) मृतदेह पाली पोलीस स्थानकासमोर आणला व मोटारसायकलस्वाराला तातडीने पकडून कारवाई करण्याची मागणी केली.

यासंदर्भात पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या समवेत सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष गणपतराव सितापराव, सुधागड तालुका समन्वयक व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष राजेश मपारा, शिरिष सकपाळ, संजय फाळे, जिवन साजेकर, धनंजय चोरगे,सुरेश सकपाळ, पोलीस पाटील सुधीर महाले, विवेक तेलंगे, दादू गोळे आदिंची चर्चा झाली. या प्रकरणातील मोटारसायकलस्वाराला तातडीने पकडून कारवाई करण्याची मागणी उपस्थितांनी केली. लवकरच शांतता कमिटीची बैठक आयोजीत करुन वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबतच्या महत्वपुर्ण सुचना नागरीकांना देण्यात येतील असे पोलीस निरिक्षक पाटील यांनी सांगितले. या प्रकरणातील सबंधीत मोटारसायकलस्वारावर जलदगतीने कारवाई केली जाईल. असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह तेथून नेला. याबाबत पुढील तपास पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एच.सी.पाटील हे करीत आहेत.

Web Title: esakal marathi news pali accident news

टॅग्स