esakal | चिपळूणातून होणार वणवा मुक्त कोकणचा प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

Establishment of Vanvas Mukta Gram Samiti Awareness campaign in 165 villages

कोकणात उन्हाळयामध्ये वणव्याची समस्या गंभीर स्वरूपाची असते  

चिपळूणातून होणार वणवा मुक्त कोकणचा प्रारंभ

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : वणव्यामुळे होणारे वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी चिपळूण येथील वन्यजीवरक्षक भाऊ काटदरे यांनी 15 व्या राज्य वन्यजीव मंडळाच्या सभेत मांडलेला वणवामुक्त कोकणचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. वणवामुक्त कोकणची सुरूवात चिपळुणातून होणार आहे. या अनुषंगाने वणवामुक्त ग्राम समितीची स्थापना करण्यात येणार असून तालुक्यातील 165 गावांमध्ये जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.


कोकणात उन्हाळयामध्ये वणव्याची समस्या गंभीर स्वरूपाची असते . यामुळे होणार्‍या उजाड डोंगरामुळे कोकणच्या सौंदर्याला हानी तर पोहचतेच, शिवाय जंगलावर अवलंबून वन्यप्राणी, पक्षी यांचे जीवन संकटात येेते. कोकणातील अनेक औषधी वनस्पतीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान वाढीच्या गंभीर समस्येमध्ये वणवे अधिकच भर घालत आहेत. सध्या सरकारच्या फलोद्यान योजनेमधून आंबा, काजूच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. यातील अनेक बागांना या वणव्यांना तोंड द्यावे लागत आहे.  

हेही वाचा- सिंधुदुर्गात गणेशोत्सव  साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना जाहीर : के मंजुलक्ष्मी -

या पार्श्वभूमीवर वणव्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी वणवामुक्त कोकण’साठी येत्या पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करण्यात यावा व तो अंमलात आणला जावा याबाबतचा प्रस्ताव काटदरे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या सभेत मांडला होता. या प्रस्तावात वणवा लावणे कायद्याने गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करणे, वणवामुक्त ग्राम समिती नेमणे, वणवामुक्त गाव पारितोषिके, वणवा त्वरित विझवण्याबाबत ग्रामसभेत ठराव व याबाबतची जनजागृती आदी बाबींचा या प्रस्तावात समावेश आहे.

हेही वाचा-रत्नागिरीत चार पोलिसांसह 18 जणांना कोरोनाची बाधा..... -
वन्यजीव मंडळाने हा प्रस्ताव स्वीकारल्याने शासनाकडून याबाबत कार्यवाही होणार आहे. त्यासाठी लोकसहभागाचीही आवश्यकता आहे. याची सुरूवात चिपळूण तालुक्यातून करण्यात येणार आहे. यासाठी विविध संस्था, व्यक्ती यांना सहभागी करून घेता येणार आहे. त्यासाठी एक समिती बनवण्यात येणार असून या माध्यमातून तालुक्यातील 165 गावांत जनजागृती करण्यात येणार आहे. यानंतर हा प्रकल्प संपूर्ण कोकणात राबवण्यात येणार आहे. तरी यामध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी काटदरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन - अर्चना बनगे