इथेनॉल, सीएनजी उत्पादनाचा रत्नागिरीत प्रकल्प

राजेश कळंबटे
रविवार, 9 डिसेंबर 2018

रत्नागिरी - काजू बोंडांपासून इथेनॉल आणि सीएनजीचे उत्पादन करण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दहा सदस्यीय अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. त्याचा अहवाल साठ दिवसांत शासनाला सादर केला जाणार आहे. 

रत्नागिरी - काजू बोंडांपासून इथेनॉल आणि सीएनजीचे उत्पादन करण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दहा सदस्यीय अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. त्याचा अहवाल साठ दिवसांत शासनाला सादर केला जाणार आहे. 

याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. काजू बोंडूच्या रसापासून फेणी, वाईन, इथेनॉल, सीएनजी, व्हाईट स्पिरीट आदी पदार्थ निर्मिती करता येते. काजू बोंडूच्या चोथ्यापासून फायबर, पोल्ट्रीसाठी खाद्य व पशुखाद्य निर्माण करणे शक्य आहे. याबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती सर्वंकष अभ्यास करून दोन महिन्यात सरकारला अहवाल सादर करणार आहे. कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात काजूची मोठ्या प्रमाणात लागवड होते.

काजू बियांवर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्याप्रमाणात आहेत. काजू बियाव्यतिरिक्त बोंडांचे सुमारे 22 लाख मेट्रिक टन उत्पादन होते. मात्र त्यावर प्रक्रिया करणारे फारसे उद्योग नाहीत. बर्‍याच वेळा ती फेकून दिली जातात. या बोंडापासून इथेनॉल व सीएनजी तयार करण्यास प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे पणन संचालक या समितीचे अध्यक्ष असतील. त्यांच्यासोबत एकूण दहा सदस्य या समितीत असणार आहेत.

या समितीचे अध्यक्ष पणन संचालक आहेत. सदस्य म्हणून फलोत्पादन संचालक, सहसंचालक उपपदार्थ, साखर आयुक्त कार्यालय, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, उदय कुलकर्णी, संतोष गोंधळेकर, अतुल काळसेकर, हरीश कांबळे (दापोली), सुगनल उकीडवे (कुडाळ) यांची, तर सदस्य सचिव म्हणून विभागीय कृषी सहसंचालक, कोकण भवन ठाणे हे काम पाहणार आहेत.

रत्नागिरीत 91,530 हेक्टरवर लागवड

रत्नागिरी जिल्ह्यात 91 हजार 530 हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. त्यात 83 हजार 292 हेक्टर क्षेत्र हे उत्पादनक्षम आहे. गतवर्षी एक लाख चार हजार 847 मेट्रीक टन काजू बीचे उत्पादन प्राप्त झाले होते. त्याच तुलनेत काजू बोंडाची निर्मिती होते.

Web Title: Ethanol, CNG production Project in Ratnagiri