कारागृहावरील हल्ल्याच्या वृत्ताने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

सावंतवाडीतील प्रकार : पोलिसांनी यंत्रणेची सतर्कता तपासण्यासाठी घेतली रंगीत तालीम

सावंतवाडी :  येथील कारागृहात अटकेत असलेल्या दोघा अतिरेक्‍यांना सोडविण्यासाठी दहशतवादी हल्ला झाला, आणि त्यात सात जण मारले गेले आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून हाय अलर्ट करण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्ग रोखण्यात आला, अशी बातमी आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास धडकल्याने यंत्रणेसोबत शहरात मोठी खळबळ उडाली. यात नेमके काय झाले हे कोणालाच माहीत नव्हते. पोलिसही सक्रिय झाले, मात्र ही रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वानी निश्‍वास सोडला.

याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील जेलवर हल्ला करून सात आरोपी पळाल्याची घटना ताजी असतानाच सावंतवाडी कारागृह आणि परिसरातील पोलिस किती अलर्ट आहेत हे तपासण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या आदेशानुसार ही रंगीत तालीम घेण्यात आली. यात सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक येथील कारागृहाकडे जाणारा मुंबई-गोवा महामार्ग बंद करण्यात आला. कारागृहात नकली गोळ्या तसेच बॉम्ब वापरून जोरदार वातावरण निर्मिती केली. यात दोन पोलिसांचा गणवेशधारण केलेले हत्यारबंद दोघे आतंकवादी आपल्या कैद्याच्या रूपात असलेल्या एका साथीदारांसह कारागृहात शिरले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट सुरू केला आहे. यात एक कारागृह पोलिस जखमी झाला आहे आणि आता त्या पाचही जणांना पकडण्यासाठी मोहीम राबविण्यात येत असल्याचा संदेश देण्यात आला.

यात येथील पोलिस ठाण्याचे स्थानिक पोलिसांसह जलद कृती दल, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक व बॉम्ब नाशक पथक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, दहशतवादी विरोधी पथकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. आणि कारागृह चारही बाजूने सिल केले. या वेळी कारागृहाच्या परिसरात जाणारे रस्ते चारही बाजूने बंद करण्यात आले होते.

दरम्यान, तब्बल सव्वा तासानंतर ही मोहीम फत्ते करण्यात आली. यात तीन आंतकवाद्यांसमवेत कैदेत असलेल्या दोघांना पकडण्यात आले. या परीक्षेत सर्व विभाग उत्तीर्ण झाले आहेत, मात्र ओरोस येथून आलेल्या श्‍वान पथकाला त्या ठिकाणी येण्यास काहीसा वेळ लागला तर सावंतवाडी पालिकेचा बंब, कुटिर रुग्णालयाची रुग्णवाहिका, 108 रुग्णवाहिका त्या ठिकाणी वेळेत पोचली असल्याचे श्री. गवस यांनी सांगितले.
या मोहिमेत अपर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, गृह विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी एस. आर. गावडे, पोलिस उपनिरीक्षक सतीश निकम, रणजित पाटील आदी सहभागी झाले होते.

सावंतवाडीत फुटले अफवांचे पेव
कारागृहाकडे जाणारा रस्ता बंद आणि त्या ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकावयास मिळाल्यानंतर शहरभर कारागृहात आंतकवादी हल्ल्याची अफवा पसरली. जो तो नेमकी वस्तुस्थिती पाहण्यासाठी कारागृहाच्या परिसरात धावत होता. त्यांना रोखण्याचे काम स्थानिक पोलिस करीत होते.

कमालीची गुप्तता
कारागृहात राबविण्यात आलेल्या रंगीत तालमीबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. त्यामुळे नेमके काय घडले हे कोणालाच माहिती नव्हते. त्यामुळे अफवांचे पिक जिल्ह्यासह राज्यभरात निर्माण झाले, मात्र आपली यंत्रणा किती अलर्ट आहे हे पाहण्यासाठी गोपनीयता पाळण्यात आली होती. नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व, असे पोलिस उपविभागीय अधिकारी श्री. गवस यांनी सांगितले.

(छायाचित्रे : अमोल टेंबकर)

Web Title: The excitement of the attack on the jail report

फोटो गॅलरी