आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

मालवण तालुक्‍यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेला 15 लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज आहे. तसे नियोजन प्रशासकीय पातळीवर केले आहे. येत्या 17 ला आंगणेवाडी भराडी देवी यात्रा, तर 21 ला देवगड तालुक्‍यातील कुणकेश्‍वर महाशिवरात्र यात्रा होत आहे.

कणकवली ( सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेसाठी यंदा 125 तर कुणकेश्‍वरसाठी एसटी महामंडळाच्या 80 जादा एसटी बस सोडण्यात येणार आहेत. कणकवली, कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी येथील रेल्वेस्थानकातून थेट गाड्यांची सुविधा एसटी विभागाने ठेवली आहे. यासाठी रेल्वेस्थानक आणि यात्रा स्थळावर विशेष नियंत्रण कक्ष ठेवल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ तसेच विभागीय वाहतुक अधिकारी अभिजीत पाटील यांनी आज दिली. 

श्री. पाटील म्हणाले, मालवण तालुक्‍यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेला 15 लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज आहे. तसे नियोजन प्रशासकीय पातळीवर केले आहे. येत्या 17 ला आंगणेवाडी भराडी देवी यात्रा, तर 21 ला देवगड तालुक्‍यातील कुणकेश्‍वर महाशिवरात्र यात्रा होत आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग एसटी विभागाने बसगाड्यांचे नियोजन प्रवाशांच्या दृष्टीने केले आहे. या यात्रांसाठी रेल्वेच्या जादा गाड्या असून 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत भराडी देवी यात्रेसाठी बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा - यंदा हापूसचे  `इतकेच` उत्पादन 

आंगणेवाडी येथे तीन नियंत्रण कक्ष आहेत. एसटी बस बंद पडल्यास खाजगी क्रेन आणि दोन ब्रेकडाऊन व्हॅन ठेवल्या आहेत. कुणकेश्‍वर महाशिवरात्र यात्रेसाठी कणकवली, देवगड, आचरा, मालवण येथून जादा गाड्या 20 ते 23 फेब्रुवारीला सोडण्यात येतील. तसेच कणकवली आणि नांदगाव रेल्वे स्थानकावर विशेष गाड्या ठेवली जातील. 

मुंबई, पुण्यातून थेट गाड्यांची सोय 

यात्रा स्थळावरून मुंबई, पुणे, कोल्हापूरसाठी जादा गाड्या सोडल्या जातील. प्रवाशांनी ग्रुप बुकींग केल्यास नियंत्रण कक्षामधून प्रवाशांना या जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात येईल. 

हेही वाचा - रामकंद छे ! हे तर... 

कणकवलीत विशेष पार्कींग हवे 

कणकवली शहरात प्लायओव्हर ब्रिजचे काम सुरू असल्याने यंदा वाहतुक कोंडी होणार आहे. त्यामुळे पार्कींगची विशेष सुविधा करण्याची गरज आहे. शहरात पार्कींगची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी नियोजनाची गरज आहे. 

"" आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा आणि कुणकेश्‍वरच्या महाशिवरात्र यात्रेसाठी भाविकांनी एसटी बस सेवेचा लाभ घ्यावा. प्रवाशांची सुरक्षितता ही आमची जबाबदारी आहे. वाहतुकीची कोंडी आणि भाविकांची होणारी गैरसोय थांबण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी एसटीचा लाभ घेतल्यास यात्रा सुखकर होईल. आमच्या विभागाकडे पुरेशा गाड्या असून इतर विभागाकडून ज्यादा 30 बस गाड्या मागविल्या आहेत. 
- प्रकाश रसाळ, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ सिंधुदुर्ग. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extra Buses For Anganewadi, Kunkeshwar Yatra Sindhudurg Marathi News