
ऐन अक्षय्य तृतीय आणि ईद सणाला मंगळवारी (ता.3) दुपारी पालीतील कुंभारआळी जवळील भर वस्तीत असलेल्या मेणबत्ती व सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला भीषण आग लागली.
पालीत मेणबत्ती व सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला भीषण आग
पाली - ऐन अक्षय्य तृतीय आणि ईद सणाला मंगळवारी (ता.3) दुपारी पालीतील कुंभारआळी जवळील भर वस्तीत असलेल्या मेणबत्ती व सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला भीषण आग लागली. ही भयानक आग विझविण्यासाठी हिंदू व मुस्लिम धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन आटोकाट प्रयत्न केले. आगीचे व धुराचे लोळ दूरवरून दिसत होते. दुपारी साडेतीन च्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. मात्र आगीमुळे कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा कारखाना भरवस्तीत असल्याने आजूबाजूच्या गजरांना व लोकांना या आगीची झळ पोहोचली. यावेळी नागरिकांनी कारखाना मालकावर संताप व्यक्त केला. भरवस्तीतील हा कारखाना इतरत्र हलविण्यात यावा अशी मागणी वारंवार येथील रहिवाश्यांनी केली आहे.
नागरिकांनी प्रसंगावधानता दाखवून ताबडतोब आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. जवळपास निम्म्याहून अधिक आग नागरिकांनी विझवली. नंतर सुप्रीम पेट्रोकेमिकल्स, रिलायन्स कंपनी रोहा एमआयडीसी मधून अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी उर्वरित आग विझवली. यावेळी पाली पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार दिलीप रायण्णावार, पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, जिल्हा परिषद सदस्य सदस्य सुरेश खैरे व रवींद्र देशमुख, नगराध्यक्षा गीता पालरेचा, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, नगरसेवक गणेश सावंत व सुलतान बेनसेकर आणि भाजपा दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मपारा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Extreme Fire At Pali Candle And Essential Oil Factory
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..