
सिंधुदुर्ग : नवोदय परीक्षेसाठी ‘बनावट’ विद्यार्थी
मालवण: तालुक्यातील ग्रामीण भागातील एका माध्यमिक शाळेत शिक्षण घेत नसलेल्या परजिल्ह्यांतील सुमारे १९ विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार आज शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. ‘त्या’ प्रशालेत जात या प्रकाराची पोलखोल केली. यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. परजिल्ह्यांतील ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेशपत्र दिली, ती तत्काळ मागून घ्यावीत. याची कार्यवाही न झाल्यास संबंधित मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकाराची संबंधित प्रशालेच्या स्थानिक व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली असून, यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केल्याचे शिवसेना पदाधिकारी मंदार केणी, युवासेनेचे मंदार ओरसकर यांनी सांगितले. तालुक्यातील ग्रामीण भागातील एका प्रशालेत परजिल्ह्यांतील १९ विद्यार्थ्यांचा प्रवेश दाखवून त्यांना नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी परीक्षेस बसण्यासाठी संबंधित मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्रावर स्वाक्षरी केल्याची माहिती शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरुन माजी नगरसेवक केणी, युवासेनेचे पदाधिकारी ओरसकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, प्रसाद आडवणकर, सचिन गिरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजीत जाधव, उदय दुखंडे, सदा राणे, मनोज मोंडकर, उमेश मांजरेकर, सन्मेश परब, रोहित पालव, यशवंत गावकर आदींनी आज सकाळी ‘त्या’ प्रशालेत धडक देत याबाबत मुख्याध्यापकांना जाब विचारला. यावेळी मुख्याध्यापकांनी पटसंख्येसाठी हा प्रवेश दाखविल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात वर्गात जात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिली आहेत. त्यांची नावे पुकारली असता एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याचे आढळले. त्यामुळे शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय करत बोगस विद्यार्थी दाखवणाऱ्या मुख्याध्यापक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. परजिल्ह्यातील सुमारे १९ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांची भेट घेत हा प्रकार निदर्शनास आणून दिला. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी प्रवेशपत्र दिले जात असल्याची माहिती यापूर्वीच माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना कळविल्याचे स्पष्ट केले. यावर माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे पुढे आले. यामुळे शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत येत्या शनिवारी होणऱ्या परीक्षेपूर्वी परजिल्ह्यातील ज्या १९ विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिले आहे ते तत्काळ मागून घ्यावे व त्यांना परीक्षेस बसू देऊ नये. या परीक्षेस मूळ प्रवेशपत्र असलेल्या स्थानिक विद्यार्थ्यांनाच बसवावे. याची कार्यवाही न झाल्यास संबंधित मुख्याध्यापक व माध्यमिकचे शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडू, असा इशारा केणी व ओरसकर यांनी दिला.
Web Title: Fake Students Navodaya Exam Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..