`बाप्पा... पुढच्या वर्षी लवकर या`, अशी साद, अन् भक्तीमय वातावरण

विनोद दळवी 
Thursday, 27 August 2020

सायंकाळपासून सुरु झालेले विसर्जन रात्री उशीरापर्यंत सुरू होते. 'एक दोन तिन चार... गणपतीचा जय जयकार' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा गजर सर्वत्र ऐकू येत होता.

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत असला तरी गणेश भक्तांचा उत्साह मात्र कोठेही कमी होताना दिसत नाही. सामाजिक अंतर ठेवून त्याच उत्साहात त्याच जल्लोषात बाप्पाच्या जयजयकाराच्या गजरात दीड दिवसानंतर आज जिल्ह्यातील पाच दिवसांच्या गणरायास भक्तिभावाने निरोप देण्यात आला. उशिरापर्यंत बाप्पाला निरोप देण्यात येत होता. पोलिस यंत्रणेच्या माहितीनुसार जिल्ह्यातील पाच दिवसांच्या 13 हजार 754 घरगुती आणि 8 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. 

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात 32 सार्वजनिक तर 68 हजार 68 घरगुती गणरायाची स्थापना केली होती. सोमवारी दीड दिवसाच्या 19 हजार 747 घरगुती आणि 7 सार्वजनिक गणरायाला भक्तीपूर्ण वातावरण भाविकांनी निरोप दिल्यानंतर आज जिल्ह्यातील पाच दिवसाच्या गणपतींची विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून तलावावर व नदीच्या ठिकाणी विसर्जनास सुरुवात केली.

सायंकाळपासून सुरु झालेले विसर्जन रात्री उशीरापर्यंत सुरू होते. 'एक दोन तिन चार... गणपतीचा जय जयकार' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा गजर सर्वत्र ऐकू येत होता. रात्री उशिरापर्यंत तलाव, नद्या आणि गणेश घाटावर मोठ्या संखेने भाविक उपस्थित होते. विसर्जन स्थळांवर जिल्हा पोलिस दलाच्यावतीने पोलीस तैनात असून भाविकांच्या सुरक्षेकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात आले. 

सार्वजनिक आठ मूर्ती 
जिल्ह्यात विधिवत 32 ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली असून आज पाचव्या दिवशी जिल्ह्यातील 8 सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यात दोडामार्ग 1, सावंतवाडी 2, वेंगुर्ले 2 व कुडाळ 1 आणि कणकवली 2 गणपतीचा समावेश आहे. 

13754 बाप्पांचे विसर्जन 
जिल्ह्याच्या पोलिस यंत्रणेकडून मिळालेल्या माहीतीनुसार जिल्ह्यातील पाच दिवसाच्या 13 हजार 754 बाप्पांना भक्ति भावाने निरोप देण्यात आला. यात दोडामार्ग पोलिस ठाणे हद्दितील 684, बांदा-657, वेंगुर्ले-1013, कुडाळ-4115, सावंतवाडी-2390, निवती-223, सिंधुदुर्गनगरी-625, मालवण-355, आचरा-580, कणकवली-1330, देवगड-665, विजयदुर्ग-312, वैभववाडी-705 गणरायांचा समावेश आहे. 

सावंतवाडीतही उत्साह 
सावंतवाडी - जिल्ह्यात आज 5 दिवशीय गणपतीचे विसर्जन अगदी साध्या पद्धतीने करण्यात आले. आज भक्तिमय वातावरणात सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीना "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर', अशा जय घोषात निरोप देण्यात आला. गर्दी टाळण्यासाठी गणेश भक्तांनी सायंकाळपासून विसर्जनाला सुरुवात केली होती. 

दरम्यान, सावंतवाडी पोलिस स्टेशन, जुनाबाजार, सालईवाडा मित्रमंडळ तसेच सावंतवाडी पालिका आदी सार्वजनिक गणपतींचे विसर्जन येथील मोती तलावात करण्यात आले. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने उपाययोजना म्हणून 17, 21 दिवस ठेवण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणपतींचे पाचव्या दिवशी मिरवणूक न काढता अगदी साध्य पद्धतीने भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

जुना बाजार नरसोबा मित्रमंडळाचा, पोलीस ठाण्याचा, सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा व पालिका कर्मचारी यांच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेला सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मोठ्या भक्तिमय वातावरणात पाच दिवसांचा गणपतींचे विसर्जन करत लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यात आला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farewell to the five-day ganarayana konkan sindhudurg