पिके वाचविण्यासाठी बागायतदारांची धडपड 

भूषण आरोसकर
Tuesday, 23 February 2021

देवगड आणि वेंगुर्ले तालुक्‍यात अधूनमधून ढगाळ वातावरण होत आहेत. यामुळे फळधारणेच्या मधल्या टप्प्यात असलेला आंबा व काजू पीक संरक्षणासाठी बागायतदारांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये अधूनमधून होणारे ढगाळ वातावरण आणि कोसळणाऱ्या सरींचा शिडकावा बागायतदारांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ याठिकाणी पाऊस झाल्याने आंबा व काजू बाग मोठ्या संकटात सापडल्या आहेत.

देवगड आणि वेंगुर्ले तालुक्‍यात अधूनमधून ढगाळ वातावरण होत आहेत. यामुळे फळधारणेच्या मधल्या टप्प्यात असलेला आंबा व काजू पीक संरक्षणासाठी बागायतदारांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 
वातावरणीय बदलामुळे जिल्ह्यामध्ये सुरुवातीला वैभववाडी त्यानंतर सावंतवाडी, वेंगुर्ले व गोवा सीमेवरील दोडामार्गच्या काही भागात ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. यानंतर जिल्ह्यात काल व आज दोन दिवस ढगाळ वातावरण राहिले होते. त्यामुळे आंबा काजू बागायतदार चिंतेत सापडले आहेत.

जिल्ह्यात जानेवारीमध्ये सुरूवातीला सरींचा शिडकावा झाला होता. यामुळे आंबा व काजू बागायतदार पूर्णतः धास्तावले होते; मात्र त्यानंतर आंबा व काजू दोन्ही पिकांना चांगली व किमान तापमानाची थंडी मिळाल्यामुळे मोहोर आणि फलधारणा चांगली झाली होती. फळ पिकास कडाक्‍याची थंडी लाभल्यामुळे थांबलेली फळधारणा अविरतपणे सुरू होती. यावेळी किमान तापमान 18 अंश सेल्सिअस पेक्षाही खाली आले होते तर कमाल तापमान 35 ते 38 अंश दरम्यान राहिले होते. कमाल व किमान तापमानातील फरक वाढल्यामुळे आंबा पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले होते.

जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी काजू निघाला मोहोर येऊन परिपक्व फळ धारणा तयार झाली होती. काही मोजक्‍या ठिकाणी परिपक्व आंबा पीक तयार झाले होते. अशा परिस्थितीत समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वातावरणीय बदलामुळे जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये ढगांचा गडगडाटासह पाऊस झाला. यामुळे वैभववाडी, खारेपाटण, कणकवलीचा उत्तरेकडील व पूर्वेकडील भाग पावसाच्या तडाख्यात सापडला. दोन दिवस मुसळधार पावसाचा फटका बसला. यामुळे बागायतदारांची बोबडीच वळली. 

आकस्मिक संकट 
फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सहसा पर्जन्यसृष्टी होत नाही. त्यामुळे जानेवारी ते एप्रिलपर्यंत बागायतदार पर्जन्य व ढगाळ वातावरणाबाबत निश्‍चित असतात; मात्र आकस्मिक आलेल्या संकटामुळे बागायतदार पूर्णतः धास्तावले गेले आहेत. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यात आंबा व काजू पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. वेंगुर्ले व देवगड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात आंबा पीक घेतले जाते. 

...तर पीक बहरेल 
तालुक्‍यामध्ये दोन ते तीन दिवस काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्‍या सरींचा शिडकाव दिसून आला; मात्र तरीही बागायतदार धास्तावले आहेत. किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असल्याने आता त्यादृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. आकाश निरभ्र होऊन आणखीन काही दिवस किमान तापमानचा फायदा रात्रीच्या वेळी मिळावा. दिवसाच्या वेळी निरभ्र उष्ण वातावरण राहिल्यास अंतिम टप्प्यात असलेले आंबा व काजू पीक चांगले बहरणार आहे. 

पाडलोसमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे काजू पिकावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. काजू कलमे तसेच काजूची झाडे किडीने प्रभावित झाल्यास येणारा मोहर खाऊन टाकतील. त्यामुळे उत्पन्न कमी हाती येऊ शकते. 
- समीर नाईक, शेतकरी. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farm issue konkan sindhudurg